महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ ऑगस्ट – मुंबई – :फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तातडीने उपचार घेण्याचा निर्णय अभिनेता संजय दत्त याने घेतला. अंधेरी येथील कोकीलाबेन रुग्णालयात त्याच्यावर उपचार होणार आहेत. त्यासाठी त्याला नियमित रुग्णालयात जावे लागणार आहे. मंगळवारी रुग्णालयात जाण्यापूर्वी कुटुंबियांकडे पाहून संजय थोडा भावूक झाला होता परंतु दुसऱयाच क्षणी त्याने या संकटावर नक्कीच मात करेन अशा विश्वास छायाचित्रकारांसमोर ‘थम्स अप’ करत व्यक्त केला. संजय दत्त रुग्णालयात जाण्यासाठी घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या घरासमोर मिडियाच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती.
पत्नी मान्यता, बहिणी प्रिया आणि नम्रता या त्याच्यासोबत गाडीपर्यंत आल्या होत्या. तिघींनाही संजयने मिठी मारुन निश्चिंत रहा असा विश्वास दिला. परदेशात उपचार घेण्यापेक्षा मुंबईत कुटुंबियांच्या जवळच राहून उपचार घेण्यास संजय दत्तने प्राधान्य दिल्याचे सांगितले जाते. कुटुंबियांच्या सहवासातच आपण या आजाराशी लढून त्यावर नक्कीच मात करू असा त्याला विश्वास आहे.