महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ फेब्रुवारी ।। महाशिवरात्रीनिमित्त कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिर परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त बुधवारी (दि. 26) सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत पुण्येश्वर मंदिर आणि अगरवाल तालीम रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
पुण्येश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सायंकाळी सहानंतर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कुंभारवेस चौकातून फडके हौद चौकाकडे जाणार्या वाहनांनी गाडगीळ पुतळा चौक, जिजामाता चौकमार्गे फडके हौदाकडे जावे. सूर्य हॉस्पिटलकडून अगरवाल तालीम रस्त्याने पवळे चौकाकडे जाणार्या वाहनांनी जिजामाता चौक, गणेश रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.
फडके हौद चौकातून कुंभारवेस चौकाकडे जाणार्या वाहनचालकांनी गणेश रस्ता, फुटका बुरूज, गाडगीळ पुतळा चौकमार्गे कुंभारवेस चौकाकडे जावे. मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयाकडून सूर्य हॉस्पिटलकडे जाणार्या वाहनांनी दारूवाला पूलमार्गे फडके हौद, जिजामाता चौक, फुटका बुरूज, शनिवारवाडा, गाडगीळ चौकमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन झेंडे यांनी केले आहे.