महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ फेब्रुवारी ।। बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी हजेरी लावली. पहाटेच्या पवित्र दर्शनासोबतच दिवसभर मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. मंदिराचा गाभारा व परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला होता, तसेच विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले होते.
मध्यरात्री बारा वाजता शासकीय महापूजा पार पडली. या पूजेस माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, भोसरीचे आमदार महेश लांडगे, खेडचे आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे व इतर मान्यवर उपस्थित होते. पूजेनंतर वेदपठण करण्यात आले आणि प्रत्यक्ष यात्रेस सुरुवात झाली.
भाविकांनी “हर हर महादेव” आणि “भीमाशंकर महाराज की जय” च्या जयघोषात दर्शन घेतले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ अधिकारी, २२१ पोलीस कर्मचारी, ६० होमगार्ड आणि श्वान पथक तैनात करण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि चित्रीकरण पथकेही कार्यरत होती.
बसस्थानक ते मंदिर मार्गावर बेलफुल, पेढे आणि खाद्यपदार्थांची दुकाने सजली होती. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ३५ मिनी व मोठ्या एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच आरोग्य विभागाचे वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. अवैध दारू आणि भांग विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी कारवाई केली.
रात्री दोन वाजल्यापासून गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आणि दर्शन रांग जुन्या एमटीडीसीपर्यंत, म्हणजे तब्बल दोन किलोमीटरपर्यंत पोहोचली. भाविकांचे दर्शन सुलभ होण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त आणि कर्मचारी सतत प्रयत्नशील होते. महाशिवरात्री यात्रा यंदाही भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.