‘या’ जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, घराबाहेर पडताना काळजी घ्या, तापमानाचा पारा…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ फेब्रुवारी ।। फेब्रुवारी संपायला काहीच दिवस शिल्लक आहेत. मात्र त्यापूर्वीच उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये फेब्रुवारी महिन्यातील मंगळवार हा सर्वाधिक उष्णतेचा दिवस म्हणून नोंद करण्यात आला आहे. तर आणखी दोन दिवस उन्हाची काहिली कायम राहणार असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाण्यासह कोकण विभागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळं आणखी काही दिवस उष्णतेचा पारा कायम राहणार आहे. त्यामुळं नागरिकांना वाढत्या तापमानाचा त्रास होण्याची शक्यता आहे. नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं अवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.

हवामान खात्याने मंगळवार आणि बुधवारसाठी मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यानुसार पुढील दोन दिवस तापमान 37 ते 38 अंश इतके राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळं नागरिक हैराण झाले आहेत. देशातील कमाल तापमानात वाढ होत असून मंगळवारी आंध्र प्रदेशातील कर्नुल येथे देशातील उच्चांकी 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. किनारपट्टीय भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशाची वाढ झाली आहे. त्यानुसार, कोकणात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे.

कोकणाबरोबरच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, जेऊर, सातारा, विदर्भातील अकोला, यवतमाळ, ब्रह्मपूरी आणि चंद्रपूर येथे तापमान 36 अंशाच्यावर होते. उकाड्याने दुपारच्यावेळी घराबाहेर पडणेही तापदायक ठरत आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण लाटेचा इशारा देत यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा इशारा कायम आहे.

उन्हामुळे एकीकडे घाम, तर त्यात प्रदूषणामुळे मुंबईकरांची चिडचिड वाढली आहे. वाढत्या तापमानात आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर योग्य प्रमाणात पाणी पिण्याची गरज आहे. तसेच दुपारी उष्णता अधिक असल्याने या काळात बाहेर जाणे टाळवे, असे आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *