महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी ।। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकणासह मुंबईत आणि ठाणे, रायगडमध्ये गेल्या 24 तासांमध्ये पारा 38 अंशांवर गेल्याचं पाहायला मिळालं. उष्मा वाढत असल्यामुळं या भागांमध्य उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यात उत्तर महाराष्ट्र वगळता विदर्भ आणि कोकण क्षेत्रामध्ये सुरु असणारी ही तापमानवाढ आता चिंतेत भर टाकण्याचं काम करताना दिसत आहे.
सध्याच्या घडीला राज्यातील सरासरी तापमानाचा आकडा 36 ते 38 अंश असून, किमान आकडा 22 अंशांदरम्यान आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये तापमानाच 4 किंवा त्याहून जास्त अंशांनी तापमानवाढ झाल्यास आणि सरासरी तापमान 37 अंशांपलिकडे गेल्यास उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात येतो. सध्या हाच इशारा मुंबईसह रत्नागिरी, रायगड या भागांमध्ये जारी करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात दमट हवामानाचा इशारा जारी करण्यात आला असून, पुढील 24 तासांमध्ये तापमानात मोठ्या फरकानं चढ उतार होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञ आणि अभ्यासक के.एस. होसाळीकर यांच्या माहितीनुसार राज्याच्या काही भागांत पुढील दोन आठवडे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहू शकते. ज्यामुळं काहीसा दिलासा असेल. पण, त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होईल. कोकणात कमाल तापमानाचा आकडा वाढतच जाईल आणि मार्च महिन्यातील तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात राज्याच्या काही भागांत कमाल तापमान वाढ नोंदवली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. राज्यातील तापमानाचा एकंदर आलेख पाहता आतापासूनच सूर्यामुळं इतकी होरपळ होत असताना आता मे महिन्यात नेमकी परिस्थिती किती बिघडणार? याच विचारानं अनेकांना धडकी भरत आहे.
उत्तरेकडे पाऊस अन् हिमवृष्टीचा अंदाज…
हिमाचल प्रदेशात शुक्रवारी मंडी, कांगडा, कुल्लू आणि चंबा इथं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, हिमाचलच्या पर्वतीय क्षेत्रामध्ये हिमवृष्टीचा ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. येथील लाहौल स्पिती इथंही हिमवृष्टीचा यलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. फक्त हिमाचल नव्हे तर, जम्मू काश्मीरमध्येही हिमवृष्टी आणि पावसाचा अंदाज असून, उत्तराखंड आणि उत्तरपूर्वेकडील राज्यांमध्येही हीच स्थिती असल्याचं सांगितलं जात आहे.