वाहनांना HSRP प्लेट लावणे अनिवार्य; दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी किती खर्च येणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. १ मार्च ।। देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे.राज्यात दुचाकी, चारचाकी किंवा जड वाहनांना ही नंबर प्लेट लावावी लागणार आहे.

राज्यात एचएसआरपी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदेमध्ये प्राप्त कमी दर दिलेल्या तीन निविदाकारांची निविदा मान्य करुन उच्चाधिकार समितीने ३ कंपन्यांचे दर अंतिम केले आहेत. मान्य झालेल्या दरानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने कार्यारंभ आदेश जारी केले. हे दर ठरवलेले आहेत. त्यामध्ये नंबर प्लेट आणि फिटमेंट चार्जेसचा समावेश आहे.

अन्य राज्यात दुचाकीचे दर प्रति वाहन ४२० ते ४८० रुपये, तीन चाकी वाहन ४५० ते ५५०, चार चाकी वाहन व जड वाहने ६९० ते ८०० रुपये आहेत.यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. तर राज्यामध्ये जीएसटी वगळून दुचाकी प्रतिवाहन ४५० रुपये, तीन चाकी ५०० , चार चाकी व जड वाहने ७४५ रुपये आहे. यावरून राज्यातील दर अन्य राज्यांमधील दरांप्रमाणेच असल्याचे दिसून येते.

केंद्रीय मोटार नियम १९८९ चे नियमानुसार सर्व वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ‘ बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून ०१एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले आहे.सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्देश दिले आहेत.

तसेच काही राज्यातील दर फिटमेंट चार्जेसशिवाय आहेत. या दरांची माहिती भारतीय वाहन उद्योगाच्या एसआयएएम (SIAM) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे परिवहन विभागाने कळविले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *