महिला दिन विशेष ; MTDC च्या रिसॉर्टमध्ये महिला पर्यटकांना 50% डिस्काउंट, आता मनसोक्त फिरा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. १ मार्च ।। 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. त्याचबरोबर, मोठ-मोठ्या कंपन्यांकडूनही महिला दिनानिमित्त डिस्काउंट आणि ऑफर्स दिल्या जातात. मात्र, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यातील महिला पर्यटकांसाठी 1 ते 8 मार्च 2025 या कालावधीत पर्यटक निवासांमध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध पर्यटन उपक्रमदेखील राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.

महिला पर्यटकांसाठी १ ते ८ मार्च या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. त्या www.mtdc.co या संकेतस्थळावर सवलतीचा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ‘आई’ महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

2024 मध्ये एमटीडीसीच्या महिला दिन विशेष सवलतीला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. 1500 हून अधिक महिला पर्यटकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळं 2025मध्येही ही योजना राबवण्यात येणार आहे. पर्यटन क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महिला पर्यटकांसाठी हा विशेष उपक्रम आहे.

एमटीडीसी नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि खारघर येथील महिला संचालित पर्यटक निवास पूर्णपणे महिलांद्वारे चालवले जातात. रिसॉर्ट व्यवस्थापन, सुरक्षा, टॅक्सी सेवा, स्वच्छता, हॉटेलिंग सर्व जबाबदाऱ्या महिलांकडेच आहेत. त्यामुळं महिलांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली आहे.

1 ते 8 मार्च 2025 आणि वर्षभरातील इतर 22 दिवस असे एकूण 30 दिवस 50 टक्के सवलत असून 22 दिवसांची माहिती एमटीडीसीच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. एमटीडीसीच्या पर्यटन स्थळावर महिला बचत गटांसाठी स्टॉलची सुविधा दिली जाणार आहे. महिला पर्यटकांसाठी विशेष साहसी आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *