आज पाण्याचा होणार फैसला ; पुणे की पिंपरी-चिंचवड, कोणाला मिळणार अतिरिक्त कोटा?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. १ मार्च ।। पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी आज, शनिवारी कालवा सल्लागार समितीची बैठक होत आहे. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे, पिंपरी-चिंचवड शहराला किती पाणी द्यायचे, मे महिन्यात शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडायचे की नाही याबाबत निर्णय होणार आहे. पुणे शहराला अतिरिक्त पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी होत असल्याने या बैठकीककडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणांत आजमितीला १७.११ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ५८.६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात १६.१९ टीएमसी (५५.५५ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा निम्म्यावर आला असून, आणखी चार महिने पाणीपुरवठा करण्याचे आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे. दर वर्षी पावसाळ्यानंतर १५ ऑक्टोबरला पाण्याचे नियोजन करण्यात येते. मात्र, त्या वेळी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्याने कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नाही. पुण्याच्या पाण्याचा फैसला लांबणीवर टाकण्यात आला होता. आता बहुप्रतीक्षित बैठक आज, शनिवारी होत असल्याने पिण्यासह शेतीच्या पाण्याबाबत फैसला होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेला सध्या १४.५० टीएमसी इतका पाणी कोटा मंजूर आहे. समाविष्ट गावांमुळे पुणे शहराची लोकसंख्या वाढली आहे. लोकसंख्या लक्षात घेता पुण्याला अतिरिक्त पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे महापालिका मंजूर पाणी कोट्यापेक्षा अधिक २२ टीएमसी पाणी उचलत आहे. अतिरिक्त पाणी उचलण्याबाबत; तसेच वापरात येत असलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करीत नसल्याने पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाने दंड आकारणी केली आहे. ‘पुणे महापालिकेला पाण्याचा वाढीव कोटा द्यायचा की नाही याचा विचार करू,’ असे जलसपंदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले होते. त्यावरून पुण्याच्या पाण्याचा वाद पेटला होता. त्यात पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीसुद्धा जलसंपदामंत्र्यांना सुनावून पुण्याच्या पाण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *