RTE Admission: आरटीई प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. १ मार्च ।। शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शुक्रवारी (दि. 28) पहिली मुदतवाढ दिली. प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचे आता 1 ते 10 मार्चदरम्यान प्रवेश निश्चित करता येणार आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत 47 हजार 559 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई प्रवेश मुदतवाढीसंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले.

यंदा राज्यातील 8 हजार 853 शाळांमधील 1 लाख 9 हजार 87 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 3 लाख 5 हजार 152 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. ऑनलाइन सोडतीद्वारे 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करून प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रवेश जाहीर झालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

प्रवेश प्रक्रियेत पालकांच्या निवासी पत्त्याच्या पुराव्याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार स्वत:च्या मालकीची निवासव्यवस्था असलेल्या पालकांना शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, वीज देयक, दूरध्वनी देयक, मिळकतकर देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल.

तर, स्वत:च्या मालकीची निवासव्यवस्था नसलेल्या पालकांना ते ज्या क्षेत्रातील शाळा निवडत आहेत, त्या क्षेत्रातील निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, वीज देयक, दूरध्वनी देयक, मिळकतकर देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल.

पुण्यात साडेसहा हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश

पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी 960 शाळांमध्ये 18 हजार 498 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 61 हजार 573 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी 18 हजार 161 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. यातून आत्तापर्यंत 6 हजार 818 विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकूण शाळा: 8863

असलेल्या जागा: 109087

बालकांचे अर्ज: 305152

सोडतीमधून प्रवेश: 101967

शुक्रवारपर्यंतचे प्रवेश: 47559

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *