रायगडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार ? फडणवीस स्पष्टच म्हणाले ….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. ३ मार्च ।। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाचे भरत गोगावले आणि अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांच्यात वाद सुरू आहे. पालकमंत्रीपद न मिळाल्याने गोगावले तर मिळालेले पद गमावल्याने आदिती तटकरे या नाराज आहेत. यावरून दोन्ही गटांकडून शह-काटशहचे राजकारण सुरू असताना आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थितीत रविवारी महाड, रायगड-अलिबाग येथील दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, न्यायालय नूतन इमारतीच्या कोनशिला अनावरण आणि भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला आदिती तटकरे आणि भरत गोगावले देखील उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला.

रायगडचं पालकमंत्रीपद शिंदे गट किंवा अजित पवार गटाला देणार की भाजप स्वत:कडे ठेवणार? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. आता रायगडचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यामुळे काही चिंता करण्याचे कारण नाही, असे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांच्या उजव्या बाजूला आदिती तटकरे तर डाव्या बाजूला भरत गोगावले उभे होते. त्यांच्या या उत्तरामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट होते.

याआधी महायुती सरकारने 18 जानेवारीला पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना न देता अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना देण्यात आले होते. त्यावरून रायगड जिल्ह्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामासत्र सुरू केले होते. इतकेच नव्हे तर महामार्गावर रास्ता रोको केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *