महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. ४ मार्च ।। मार्चच्या पहिल्या आठवड्यातच अवघा देश जणू धगधगता अग्निकुंडच बनला आहे. राज्यात कोकणला 6 मार्चपर्यंत उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कसा असेल, याची झलक पाहावयास मिळत आहे.
हवामान विभागाने संपूर्ण देशाचा नकाशाच उपग्रहाने काढलेल्या फोटोवरून तयार केला आहे. यात संपूर्ण देश लाल रंगात दाखवण्यात आला आहे. त्यामुळे मार्चच्या पहिल्याच आठवड्यात देशात जणू अग्निकुंड पेटल्यासारखे जाणवत आहे. कोकणात कमाल तापमानाचा पारा 37 ते 38 अंशांवर आहे. शिवाय, त्या भागात आर्द्रतादेखील आहे. त्यामुळे या भागातील हीट इंडेक्स (उष्मा घातांक) वाढल्यामुळे अवस्थ करणारे वातावरण आहे.
कोरेगाव पार्क 39 अंशांवर
कोकणला उष्मा वाढल्याचा ‘यलो अलर्ट’ जारी केली असला, तरी राज्यात सर्वत्र उन्हाच्या भयंकर झळा जाणवत आहेत. सोमवारी पुणे शहरातील कोरेगाव पार्कचा पारा राज्यात सर्वाधिक 39 अंशांवर गेला होता. त्यापाठोपाठ विदर्भातील ब्रह्मपुरी येथे 38.6 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. मुंबई 32.8, तर सांताक्रुझ 35.8 अंशांवर आहे. कोकण, मुंबईपाठोपाठ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रही धगधगत आहे.
सोमवारचे कमाल, किमान तापमान
कोरेगाव पार्क (पुणे) 39 (21.7), मुंबई (कुलाबा) 32.8 (24), सांताक्रुझ 35.1 (21.2), रत्नागिरी 36.9 (21.6), डहाणू 31.3 (20), पुणे (शिवाजीनगर) 36.2 (17.1), अहिल्यानगर 37 (17.3), जळगाव 36.2 (16.2), कोल्हापूर 35.5 (22.1), महाबळेश्वर 29.3 (18.6), मालेगाव 37.6 (18), नाशिक 35.6 (16.6), सांगली 37.2 (20.8), सातारा 36.1 (19), सोलापूर 37.9 (22.4), धाराशिव 35.4 (20.7), छ. संभाजीनगर 35.4 (20.4), परभणी 36.6 (20.4), बीड 35.6 (21), अकोला 37.7 (20.2), अमरावती 35.4 (18.7), बुलडाणा 35(21.4), ब्रह्मपुरी 38.6 (19.9), चंद्रपूर 38.2 (21), गोंदिया 35.4 (18.2), नागपूर 36.7 (18.2), वाशिम 35.6 (21), वर्धा 32 (20) आणि यवतमाळ 37 (18.4)