महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. ४ मार्च ।। कधीकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आता प्रचंड उष्णतेचा सामना करत आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद पुण्यातील लोहगाव येथे झाली असून, सोमवारी येथे तापमान ३९.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. त्यामुळे लोहगाव राज्यातील सर्वाधिक “हॉट स्पॉट” ठरले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्यातील तापमानात लक्षणीय वाढ होत असून, शहरातील बहुतांश भागांत उन्हाची तीव्रता जाणवत आहे. वडगाव शेरी, मगरपट्टा, कोरेगाव पार्क या परिसरातही तापमान अधिक असल्याचे निरीक्षणात आले आहे. या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दहा दिवसांमध्ये पुण्यातील कमाल तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना अजूनही उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. तापमान वाढीमागील कारणांमध्ये हवामानातील बदल, शहरीकरण, वृक्षतोड, तसेच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणारे प्रदूषण यांचा समावेश आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान बाहेर पडण्याचे टाळावे, भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे.
वाढत्या तापमानाचा फटका लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना अधिक बसू शकतो. त्यामुळे अशा नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. उष्माघाताच्या घटना टाळण्यासाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत होत असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच प्रशासनाकडूनही आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी पुणेकरांमधून होत आहे.