महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. ६ मार्च ।। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा तीव्र होत असून तापमान ३५ ते ३९ डिग्री सेल्सियसच्या दरम्यान पोहोचले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे, तर विदर्भात उष्णतेबरोबरच दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान २ ते ३ डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात ही वाढ अधिक जाणवेल आणि तापमान ३ ते ५ डिग्रीपर्यंत जाऊ शकते.
सोलापूर-चंद्रपूर सर्वाधिक तापले!
बुधवार (५ मार्च) पर्यंतच्या २४ तासांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उन्हाचा कडाका जाणवला. राज्यातील सर्वाधिक तापमान सोलापूरमध्ये ३९.४ डिग्री सेल्सियस नोंदवले गेले, त्यानंतर चंद्रपूर येथे ३९ डिग्री तापमान होते.
इतर महत्त्वाच्या शहरांतील तापमान खालीलप्रमाणे आहे:
मध्य महाराष्ट्र: सांगली (३८), जेऊर (३८)
मराठवाडा: परभणी (३८), छत्रपती संभाजीनगर (३५.५), बीड (३७.६), धाराशिव (३६.६)
विदर्भ: अकोला (३८.५), अमरावती (३७), नागपूर (३७.६), भंडारा (३७), गडचिरोली (३७.४)
पुणे आणि मध्य महाराष्ट्रात वाढता उष्माघाताचा धोका
मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. पुण्यात बुधवारी ३६.८ डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले, तर सोलापूरात हे तापमान तब्बल ३९.४ डिग्रीवर पोहोचले. नाशिक आणि अहमदनगरमध्येही तापमानाने चढ उतार सुरू आहेत.
राज्यातील काही भागांत हीट वेव्ह (गरम लाट) निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांत तापमान ३६ डिग्रीच्या पुढे गेले असून, उष्णतेसोबत दमट हवामानही जाणवू लागले आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, भंडारा, यवतमाळ आणि गडचिरोली येथे नागरिकांना अधिक अस्वस्थता जाणवत आहे. येत्या काही दिवसांत तापमान ३९ डिग्रीच्या पुढे जाऊ शकते, असा अंदाज आहे.