महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. ११ मार्च ।। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.. विकास आता लांबणार नाही’, असे म्हटले. अजित पवार यांनी विविध घटकांशी संबंधित अनेक घोषणा देखील केल्या. ते अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करत होते.
अर्थसंकल्पामध्ये पुणे शहर आणि आसपासच्या परिसराला फायदा होईल अशा योजनांची माहिती अजित पवारांनी दिली. पुणे मेट्रोचा विस्तार, पुणे-पिंपरी चिंचवड भागात टेक्निकल टेक्सटाईल मिशन अशा अनेक प्रकल्पांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून पुण्याला काय मिळालं? जाणून घ्या.
१. वाहतूक आणि पायाभूत सुविधा
– पुणे मेट्रो विस्तार – पुढील वर्षभरात २३.२ किमी नवीन मेट्रो मार्ग सुरू होणार.
– पुणे-शिरूर उन्नत मार्ग – ५४ किमी, ७५१५ कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प.
– तळेगाव-चाकण उन्नत मार्ग – २५ किमी, ६४९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित.
२. औद्योगिक आणि आर्थिक विकास
– पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन.
– पुण्यात IT आणि मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांसाठी नवीन गुंतवणूक आणि प्रोत्साहन योजना.
३. पर्यावरण आणि शाश्वत विकास
– सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प – पुण्यात मोठ्या प्रमाणावर पुनर्वापर योजना.
– हरित ऊर्जा प्रकल्प – वीज दरात बचत करणारी उपाययोजना.
४. कृषी आणि ग्रामीण विकास
– मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज.
– जलयुक्त शिवार योजना २.० – पुणे जिल्ह्यातील ५००+ गावांसाठी जलसंधारण प्रकल्प.
– नदीजोड प्रकल्प – पुण्यातील शेतीसाठी पाणीपुरवठा वाढवण्याचे नियोजन.