महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २० ऑगस्ट – : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करुन पूर्ण सहकार्य करेल, अशी खात्री असल्याचे पवारांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या तपासाची परिणीती डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासाप्रमाणे होणार नाही, अशी मला आशा असल्याचेही पवार म्हणाले. या संदर्भात ट्विटरच्या माध्यमातून शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश दिला. तसेच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. निकालाचे पालन महाराष्ट्राला सरकारलाही करावे लागेल, असेही न्यायालयाने सांगितले.
मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी #CBI मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 20, 2020
यानंतर आज ट्विट करुन या संपूर्ण विषयावर शरद पवारांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल. मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत 2014 मध्ये सुरु झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणीती होणार नाही.