महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. १५ मार्च ।। वातावरणात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल होत असताना दिसून येत आहेत. उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, पुणे शहर आणि जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. बुधवारी (13 मार्च) पुणे जिल्ह्यातील काही भागांत चाळीशी पार तापमानाची नोंद करण्यात आली.
राजगुरूनगर सर्वाधिक उष्ण
यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे 40°C इतके नोंदवले गेले आहे. तसेच, पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरातही तापमान 40°C पर्यंत पोहोचले. त्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त होऊ लागले आहेत. तापमानात अधिक वाढ होत असल्याने उन्हाचा चटका जाणवत आहे.
हवामान खात्याचा अंदाज
पुणे हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पुणे शहर आणि जिल्ह्यातील कमाल तापमान 41°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे आणि उष्णतेपासून संरक्षणासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच विगर्भातील उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात कुठे कसं हवामान?
विदर्भातील ब्रम्हपुरी येथे देशातील उच्चांकी 42°C अंशापेक्षा जास्त होते. सोलापूर, धुळे, मालेगाव, यवतमाळ, आणि अमरावती येथे तापमान चाळीशीपार होते. अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ येथे उष्णतेची लाट होती. तसेच, जळगाव, जेऊरी, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, गडचिरोली, गोंदिया आमि वाशीम येथे कमाल तापमान ३९ अशांपार होते.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी टिप्स:
शक्यतो दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान थेट उन्हात जाणे टाळा.
बाहेर जाताना टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरा.
शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी आणि लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रव पदार्थांचे सेवन करा.
हलके, सूती आणि सैलसर कपडे घाला.
जड आणि तळलेले पदार्थ टाळा, शक्यतो हलका आहार घ्या.
उष्णतेच्या लक्षणे (डोकेदुखी, गरगरणे, घाम जास्त येणे, थकवा) जाणवल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पुणेकरांनी उन्हाच्या वाढत्या प्रभावाचा विचार करून योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.