महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २० ऑगस्ट – : रेल्वेकडून आपल्या १३ लाख कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा दिला जाण्याची शक्यता आहे. तसा विचार रेल्वेकडून सुरू आहे. रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधीपासूनच ‘रेल्वे कर्मचारी आरोग्य योजना’ आणि ‘केंद्रीय कर्मचारी आरोग्य योजना’ यांच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र आता उपचारांची व्यापकता वाढवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
‘कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा वाढवण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्यासाठी समग्र आरोग्य विमा योजनेशी संबंधित सर्व पैलू विचारात घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. उपचार, आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी यासाठी विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे,’ असं रेल्वेनं म्हटलं आहे. याबद्दल रेल्वेनं आपले सर्व विभाग आणि उत्पादन युनिट्सच्या महाव्यवस्थापकांकडून प्रस्तावाबद्दल सूचना आणि शिफारसी मागवल्या आहेत.
रेल्वेनं देशभरातल्या आपल्या सर्व विभागांकडून नव्या आरोग्य विम्याच्या प्रस्तावाबद्दलच्या सूचना मागितल्या आहेत. त्यानंतर याबद्दलचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीला ५८६ हेल्थ युनिट्स, ४५ उपविभागीय रुग्णालयं, ५६ विभागीय रुग्णालयं, ८ उत्पादन युनिट रुग्णालयं आणि १६ झोनल रुग्णालयं उपलब्ध आहेत. यामध्ये अडीच हजारांपेक्षा अधिक डॉक्टर्स आणि ३५ हजारांहून अधिक वैद्यकीय कर्मचारी काम करतात.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रेल्वेकडे उपलब्ध असणारी आरोग्य यंत्रणा अतिशय उपयोगी ठरली. रेल्वेनं देशभरातील १२५ रुग्णांमधील साडे सहा हजारांहून अधिक बेड्स कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले. त्यामुळे स्थानिक आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी झाला.