महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. १८ मार्च ।। अभिनेता सागर कारंडे मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय कलाकार आहे. विनोदी भूमिकांमधून कधी त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवले, तर काही गंभीर भूमिका करत प्रेक्षकांच्या डोळ्यात टचकन पाणीही आणले. मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोंमध्ये सादर केलेले स्किट या सर्व माध्यमांमध्ये मेहनत घेत सागरने यश संपादन केले. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तर तो यशाच्या शिखरावर पोहोचला. झी मराठीच्या या CHYD कार्यक्रमाने काही महिन्यांपूर्वी निरोप घेतला असला तरी त्याचे विविध स्किट सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात, विशेषत: त्याने साकारलेली स्त्री पात्रे. यादरम्यान या स्त्री पात्रांविषयी सागरने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात सागरने अनेकदा स्त्री पात्र साकारले आहे. त्याच्या ‘स्वारगेटे बाई’ या पात्राचा तर एक मोठा चाहतावर्ग आहे. इतरही काही स्किटमध्ये सागरने अनेकदा स्त्रीपात्र साकारले होते. त्याच्या या पात्रांविषयी अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत, शिवाय स्किटचे व्हिडिओही सोशल मीडियावर चर्चेत येतात. असे असताना सागरने पोस्ट शेअर करत लिहिले की, तो यापुढे अशाप्रकारचे पात्र करणार नाही.
सागने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘यापुढे स्त्री पात्र करणार नाही’. त्याने असा निर्णय का घेतला किंवा नेमकं काय घडलं याविषयी अभिनेत्याने कोणताही उल्लेख केलेला नाही. त्याच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनीही याबद्दल विचारणा केली आहे.
सागरच्या निर्णयावर चाहत्यांच्या कमेंट
सागरने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ बंद झालं असलं तरीही या कार्यक्रमाचा एक मोठा चाहतावर्ग आहे आणि सागरच्या स्त्री पात्रांचा त्यात मोलाचा वाटादेखील आहे. त्यामुळे सागरच्या निर्णयानंतर चाहते काहीशी नाराजी व्यक्त करत आहेत. तर काहींनी त्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला.