महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २१ मार्च ।। राज्यात सध्या ऊन-पावासाचा खेळ सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान चाळीशी पार गेले आहे. प्रचंड उकाडा वाढला आहे तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पाऊस देखील पडत आहे. अशात आजही राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्टसह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अमरावती, वाशिम, नागपूर, गडचिरोली येथे पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून १९ तारखेपासून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण आजपासून ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तर विदर्भ वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानात अंशतः घटले आहे. पुणे, सातारा आणि सांगली मध्ये पारा ४० अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात सुद्धा काहीसा दिलासा मिळाला आहे. बीड, परभणी, नांदेड, धाराशिव येथे ३८ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
विदर्भात मात्र उन्हाची तीव्रता अधिक आहे. वाशीम येथे सर्वाधिक म्हणजे ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर, वर्धा, अकोला या जिल्ह्यात सुद्धा ३९ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.