महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. २२ मार्च ।। डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लोणावळा कर्जतला येणाऱ्या पर्यटकांना लक्ष्य करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्याचा सायबर पथकाने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केले आहे. लोणावळा कर्जत परिसरात स्वस्तात राहण्यासाठी वीला, जलक्रीडासफरी, होमस्टे बुकिंगच्या नावे पर्यटकांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी कारवाई पुणे येथून मुख्य आरोपीला अटक केली आहे.
आकाश रुपकुमार जाधवानी, (२५ वर्ष) Tourism Fraud:असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो घाटकोपर येथील राहणारा आहे. आरोपीवर मुंबईच्या अनेक पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत आरोपी ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात असून त्याने अशा प्रकारची फसवणूक किती लोकांची केली आहे याबाबतचा तपास ओशिवरा पोलीस करत आहेत.
उन्हामुळे लिंबाच्या मागणीत प्रचंड वाढ, आवक निम्म्यावर लिंबूचे दर १६० रुपये किलोवर
यमन सुरेश चटवाल हे अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहतात. जानेवारी महिन्यात सुट्टीनिमित्त त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत खोपोली किंवा लोणावळा येथे फिरायला जायचे होते. त्यामुळे त्यांनी सोशल मिडियावर व्हिला बुकींगसाठी सर्च केले होते. त्यात त्यांना एका व्हिलाची माहिती दिसली होती. या पेजवर एका व्हिलाची माहिती देताना त्यात साडेचौदा हजार फॉलोअर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी या पेजवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी समोरील व्यक्तीने व्हिला उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यानंतर यमन चटवाल यांनी १८ व्यक्तीसाठी तीन दिवसांसाठी व्हिला बुक केला होता.
दरम्यान, त्यासाठी त्यांना ८५ हजार रुपये सांगण्यात आले. त्यापैकी ४२ हजार ५०० रुपये त्यांनी संबंधित व्यक्तीला ऑनलाईन ट्रान्स्फर केले. काही दिवसांनी त्यांनी संबंधित वेबपेजची पाहणी केली असता त्यात त्यांना चांगली प्रतिक्रिया नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तीला कॉल करुन व्हिला बुकींग रद्द करुन त्याच्याकडे पैशांची मागणी केली, मात्र बुकिंग रद्द केल्यानंतर दोन दिवसात पैसे परत मिळाल्यामुळे फिर्यादी यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. आरोपीच्या मोबाईलसह ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, झोन ९चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी टीमने त्याची माहिती काढून पोलीस निरीक्षक विजय माडये, प्रशांत मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद देवरे, सहाय्यक फौजदार अशोक कोंडे, पोलीस शिपाई विक्रम सरनोबत, स्वप्निल काकडे यांनी तांत्रिक माहितीवरुन पुण्यातील खरडी, चोखी धाणी परिसरातून आकाश जाधवानी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यात त्याचा सहभाग उघडकीस आला होता.
चौकशीत आकाश हा घाटकोपर येथील पंतनगर, कर्म विहारचा रहिवाशी आहे. व्हिला बुकींगच्या नावाने त्याने आतापर्यंत अनेक गुन्हे केले आहेत. त्याच्याविरुद्ध ओशिवरा, मलबार हिल, विलेपार्ले, एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत त्याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामीनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा अशा प्रकारे फसवणुक करत असल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी अंधेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.