एसटीने प्रवास ! दर महिन्याला 300…; गावागावातील प्रवाशांना होणार फायदा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. २२ मार्च ।। शाळांना सुट्टी लागल्यावर चिमुकल्यांना वेध लागतात ते गावी जाण्याचे. सध्या परीक्षा सुरु असल्या तरी त्यानंतर लागणाऱ्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचं प्लॅनिंग आतापासूनच झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील परिवहन मंडळही सज्ज झालं असून यंदा गावी जाणाऱ्यांना सरप्राइज देण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. एसटी महामंडळ उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना थंडगार प्रवासाचा अनुभव देण्याची तयारी पूर्ण केली आहे. राज्यभरात एकूण 872 वातानुकूलित शिवशाही बसेस उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत. उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन एसटी महामंडळाने पुरेशा वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गावी जाणाऱ्यांचा प्रवास गारेगार होणार हे निश्चित.

उत्पन्नात भर पडणार
उन्हाळी सुट्टीदरम्यान मुंबई आणि उपनगरांमधून कोकण तसेच राज्याच्या इतर भागांत जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण अधिक असते. एकीकडे रेल्वेने अतिरिक्त सेवा सुरू केली तरी राज्याच्या ग्रामीण भागात जाण्यासाठी प्रवासी ‘लाल परी’ला पसंती देतात. अनेक गावांमध्ये जाण्यासाठी एसटी बसशिवाय इतर पर्यायच नाही अशीही स्थिती आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार करुन प्रवाशांचा कल एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर टाकू शकतो, या अनुषंगाने महामंडळाने एप्रिल आणि मे महिन्यात 782 वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

कुठे कुठे सोडल्या जाणार या एसी गाड्या?
नव्या धोरणानुसार सोडण्यात येणाऱ्या एसी बस या मध्यम आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश असणार आहे. मुंबई सेंट्रल व परळ आगारातूनही अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. शिवशाही बसची सेवा मुंबईतून राज्यभरात पुणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, संभाजीनगर, जळगाव, बीड, नागपूर, अहिल्यानगर अशा विविध ठिकाणी सुरू राहणार आहे. उन्हाळी सुट्टीत खासगी ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांकडून भरमसाट पैसे उकळतात. अशा परिस्थितीत अनेक प्रवासी एसटी बसेसकडे वळतात. त्यामुळे अतिरिक्त शिवशाही बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लवकरच 2640 नवीन एसी गाड्या
एसटी महामंडळाच्या ताफ्यात नजीकच्या काळात 2640 नवीन ‘लाल परी’ गाड्या दाखल होणार आहेत. दर महिन्याला 300 गाड्या अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने नवीन एसी लाल परी प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. राज्याच्या खेड्यापाड्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पाश्र्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर प्रवासी वातानुकूलित बसेसकडे वळत आहेत. प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेत उन्हाळी सुट्टीत 872 शिवशाही बसेस प्रवासी सेवेत धावणार आहेत. तसेच जादा लाल परी गाड्या सोडण्याचेही नियोजन केले जात आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन मैंद यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *