महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. २४ मार्च ।। लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांवरुन सध्या अनेक प्रश्न विचारले जात आहे. अर्थसंकल्पात २१०० रुपयांची घोषणा न केल्याने महिलांमध्ये नाराजी आहे.याचसोबत विरोधकांनीही सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. मात्र, आता लाडकी बहीण योजनेत लवकरच २१०० रुपये देऊ, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. आम्ही वचन दिलंय आम्ही त्यापासून मागे हटणार नाही, असं आदिती तटकरेंनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार आहोत. महिलांमध्ये साक्षरता निर्माण करणार आहे. २१०० रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल. आम्ही दिलेल्या वचनापासून फारकत घेणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
लाडकी बहीण योजनेवर विरोधकांची टीका
लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा अद्याप केलेली नाही, त्यामुळे विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे. विधानसभा निवडणुका होऊन बरेच दिवस झाले तरीही २१०० रुपयांबाबत काहीही अपडेट आलेली नाही.
एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? (When Will April Month Installment Deposited)
मार्च महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे महिलांचे लक्ष एप्रिलच्या हप्त्याकडे लागले आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता कधी देणार असा प्रश्न आता महिला विचारत आहेत. मागच्या महिन्यात महिला दिनाचा मूहूर्त साधत महिलांना पैसे देण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल महिन्यातदेखील असाच काहीतरी मूहूर्त काढून महिलांना पैसे देण्यात येतील, असं सांगण्यात येत आहे.