महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २० ऑगस्ट – : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीनं अचानक जाहीर केलेल्या निवृत्तीमुळे चाहत्यांना धक्का बसला. सोशल मीडियावर एक व्हिडोओ पोस्ट करत धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अलविदा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र तेव्हापासून धोनीसाठी एका फेअरवेल मॅचचे आयोजन करण्याची मागणी चाहते करत आहेत. याबाबत बीसीसीआयच्या सुत्रांकडून एक मोठी बातमी येत आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीसाठी एका फेअरवेल मॅचचे आयोजन केले जाणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट बोर्डानं धोनीसाठी एका फेअरमॅचचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र ही मॅच धोनीशी चर्चा केल्यानंतर आयोजित करण्यात येईल. सध्या धोनी आयपीएल खेळण्यासाठी युएइला रवाना होईल, त्यानंतरच याबाबत चर्चा केली जाणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन केले गेले नाही आहे. त्यामुळे धोनीसाठी आयपीएलनंतर एक सामना आयोजित केला जाईल. धोनीचा सन्मान करण्यासाठी हा सामना असणार आहे. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, धोनीनं सामन्यासाठी नकार दिला तरी, धोनीसाठी एक खास फेअरवेल नक्कीच होणार आहे.
धोनीनं निवृत्ती जाहीर केल्यानंतर माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी धोनीसाठी एका सामन्याचे आयोजन करावे, अशी मागणी केली होती. मदन लाल यांनी, जर बीसीसीआय धोनीसाठी एका फेअरवेल मॅचचे आयोजन करणार असेल तर मला आणि क्रिकेट चाहत्यांना खूप आनंद होईल, असे सांगितले. त्यामुळे आयपीएलनंतर एका खास सामन्याचे आयोजन धोनीसाठी नक्की केले जाऊ शकते.