महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २७ मार्च ।। सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यात १९९८ पासून वाद सुरू आहे. लॉरेन्स बिश्नोईने सलमानला अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यानंतर अभिनेत्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. पण ऑक्टोबर २०२४ मध्ये जेव्हा बिश्नोईने सलमानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांची सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालून हत्या केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. यानंतर सलमानची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली. ‘सिकंदर’ चा भव्य ट्रेलर लाँच कार्यक्रमही रद्द करण्यात आला. आता अलीकडेच, त्याच्या चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान, सलमानने लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या धमक्यांबाबत भाष्य केलंय.
सलमान सध्या त्याच्या ‘सिकंदर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या ईदला सलमान प्रेक्षकांसाठी ‘सिकंदर’ची भेट घेऊन आलाय. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत त्याने लॉरेन्स बिशानोईवर भाष्य केलंय. तुला सलमानला विचारण्यात आलं की, ‘तुला गेले कित्येक वर्ष जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. तुम्हाला भीती नाही वाटत? यावर सलमान म्हणाला, ‘देव, अल्लाह सगळं त्याच्यावर आहे.’
काय म्हणाला सलमान?
सलमान पुढे म्हणाला, ‘जेवढं जीवन लिहिलं आहे तेवढं लिहिलंय. बस एवढंच आहे. कधीकधी एवढ्या लोकांना सोबत घेऊन चालायला लागतं. तिथे अडचण होते.’ १९९८ मध्ये ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानने एका काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. तथापि, सलमानने आणि त्याचे वडील सलीम खान यांनी या गोष्टीला नकार दिला. या प्रकरणात, २००६ मध्ये सीजेएम कोर्टाने सलमानला १ वर्षाची शिक्षा सुनावली होती, तर जोधपूर कोर्टाने त्याला ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती.
मात्र ७ एप्रिल २०१८ रोजी सलमानला ५०,००० रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला. तर, राजस्थान उच्च न्यायालयाने २०१६ मध्येच सलमानला काळवीट शिकार प्रकरणातून निर्दोष मुक्त केले होते. तेव्हापासून लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या जीवावर उठला आहे. बिश्नोई समाज प्राण्यांचे, विशेषतः काळवीटांचे रक्षण करण्यासाठी ओळखला जातो. ते काळे हरण हे त्यांचे गुरु जंबेश्वर यांचे अवतार मानतात. सलमानमुळे संपूर्ण बिश्नोई समुदाय दुखावला गेला.