Tariffs & Stock Market: पुन्हा वाढलं टेन्शन; ट्रम्प यांनी आळवला ‘टॅरिफ’ राग… अमेरिकेचे आता….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २७ मार्च ।। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या टॅरिफ (शुल्क) निर्णयांनी जगभरातील अनेक देशांची झोप उडवली आहे. अलिकडेच व्हेनेझुएलावर कर लादल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत परदेशी गाड्या आणि त्यांच्या सुटे भागांवर २५% कर लादण्याची घोषणा केली आहे. या पावलामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल, असा दावा व्हाईट हाऊसने केला. याशिवाय, अमेरिकेला दरवर्षी यातून १०० अब्ज डॉलर्सचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे ऑटोमोबाईल टॅरिफ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा टॅरिफ बॉम्ब टाकला आणि ओव्हल ऑफिसमधील एका कार्यक्रमादरम्यान, त्यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व परदेशी गाड्यांवर २५% कर लादण्याची घोषणा केली. ट्रम्प म्हणतात की तुम्ही तुमची कार अमेरिकेत बनवली तर त्यावर कोणताही कर लागणार नाही पण, या निर्णयामुळे जागतिक पुरवठा साखळींवर अवलंबून असलेल्या वाहन उत्पादकांसाठी आर्थिक आव्हाने निर्माण होऊ शकतात. ट्रम्प यांचा हा नवीन आयात शुल्क लादण्याचा निर्णय २ एप्रिलपासून लागू होईल, ज्याची वसुली ३ एप्रिलपासून सुरू होईल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी विधानात स्पष्ट केले आहे की हा तात्पुरता नाही तर, कायमस्वरूपी निर्णय आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा परिणाम ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक मोठ्या भारतीय कंपन्यांवरही होऊ शकतो, ज्यामध्ये टाटा मोटर्स ते आयशर मोटर्सचा समावेश आहे. टाटा मोटर्स थेट अमेरिकेत निर्यात करत नाही पण, त्यांची उपकंपनी, जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ची अमेरिकन बाजारात बाजू भक्कम आहे.

भारतावर परस्पर शुल्काची टांगती तलवार
२ एप्रिलपासून भारतीय उत्पादनांवर अमेरिकेचा परस्पर कर लादण्याची शक्यता वाढत असल्यामुळे भारतीय उद्योग चिंतेत आहे आणि अमेरिकेच्या प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्याच्या योजनेमुळे भारत-अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार करारावर लवकरात लवकर शिक्कामोर्तब व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे अनेक भारतीय उद्योग-कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे नुकसान सहन करावे लागू शकते.

नव्या टॅरिफ घोषणेमुळे ऑटो शेअर्समध्ये गळती
ट्रम्प यांनी अमेरिकेत परदेशी कार आयातीवर २५ टक्के टॅरिफ लादल्यामुळे गुंतवणूकदारांनी वाहन कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदीवर ब्रेक लावला परिणामी २७ मार्च रोजी टाटा मोटर्स, सोना ब्लू प्रिसिजन फोर्जिंग्ज आणि संवर्धन मदरसन यांचे शेअर्स ७% पर्यंत कोसळले.

भारतातून अमेरिकेत पूर्णपणे असेम्ब्ल केलेल्या वाहनांची थेट निर्यात तुलनेने मर्यादित असली तरी, मोठ्या प्रमाणात निर्यात एक्सपोजर असलेल्या ऑटो कंपोनंट उत्पादकांना नव्या टॅरिफचा तीव्र फटका बसेल. ऑटोमेकर्स टाटा मोटर्स आणि आयशर मोटर्स तसेच ऑटो कंपोनंट उत्पादक सोना बीएलडब्ल्यू, संवर्धन मदरसन आणि इतर अनेक कंपन्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्या प्रामुख्याने युरोप आणि जपान, दक्षिण कोरिया आणि चीन सारख्या प्रमुख आशियाई बाजारपेठांमध्ये निर्यात करतात, जे अमेरिकेला ऑटोमोबाईल पुरवठा करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *