![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. २९ मार्च ।। वाढत्या वीजदरांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे. महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले.
या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वीज दर १० टक्क्यांनी स्वस्त होणार आहे. महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील ५ वर्षे वीज स्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार २०२५-२६ या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे १० टक्के कपात होणार आहे. नवे वीजदर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती.
मुंबईमध्ये चेंबूरच्या वीज निर्मिती केंद्रातून बेस्ट आणि टाटा या कंपन्या वीज घेतात. याठिकाणावरून घेतली जाणारी वीज महाग आहे. ग्राहकांना स्वस्त वीज द्यायची असेल तर मुंबई बाहेरून स्वस्तात वीज आणावी लागेल. आता मुंबईत वीज वाहून आणणाऱ्या वाहिन्यांची क्षमता संपली असून क्षमता वाढविल्याशिवाय मुंबईत बाहेरून वीज आणता येणार नाही. त्यामुळे विजेचे दर कमी होणार नाहीत, असे मत वीज तज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी व्यक्त केले आहे.
