महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रविवार दि. ३० मार्च ।। सोन्याचा दर सतत वाढतो आहे. मागील १२ महिन्यांत सोन्याच्या किंमतीने ५० वेळा उच्चांक गाठला आहे. गेल्या १२ वर्षांतील वाढीचा हा सर्वात मोठा कालावधी आहे. तसंच, सोन्याच्या इतिहासातील हा तिसरा सर्वाधिक तेजीचा, दरवाढीचा काळ आहे.
याआधी १९७० च्या दशकात महागाई, आर्थिक वाढ मंदावणे आणि बेरोजगारी यामुळे सोन्याच्या किमती अनेक महिने वाढल्या होत्या. त्या काळात सलग चार वर्षे सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती. पण यावेळी सोन्याच्या किमतीत गेल्या वर्षभरात ३९ टक्के आणि यंदाच्या वर्षात १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता सलग तिसऱ्या वर्षीही सोन्याचे दर वाढताना दिसत आहेत.
सोन्याच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन शुल्क लादल्याने जगातील व्यापारयुद्ध आणखी वाढू शकतं अशी भीती लोकांना वाटत आहे. अशात शेअर बाजारातही अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानून त्यात सर्वाधिक पैसे गुंतवत आहेत.
सोन्याकडे नेहमीच आर्थिक अस्थिरतेदरम्यान सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा सोन्याची किंमत वाढू लागतं. सततच्या अनिश्चिततेच्या वाढत्या चिंतेमुळे सोन्याची मागणी वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
किती वाढू शकते सोन्याची किंमत?
आयसीआयसीआय बँक ग्लोबल मार्केटच्या (ICICI Bank Global Markets) रिपोर्टनुसार, २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची किंमत ९६००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर, सोन्याचा भाव डिसेंबरपर्यंत ३२०० डॉलर ते ३४०० प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव ११०० रुपयांनी वाढला. या वाढीसह सोन्याचा दर ९२,१५० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचला. मागील आठवड्यात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर ९१,०५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता.
सोन्यासह चांदीचा दर देखील वाढला आहे. चांदीचा भाव शुक्रवारी १३०० रुपयांनी वधारला असून या वाढीसह चांदी १,०३,००० रुपये प्रति किलो या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. गुरुवाररी १,०१,७०० रुपये प्रति किलो या दरावर बंद झाला होता.