महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २२ ऑगस्ट – सर्वत्र गणरायाचे आगमन झाले आहे. आधीच करोनाने मरगळ आलेल्या अर्थव्यवस्थेसाठी गणेशोत्सव चैतन्य आणेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. मात्र याच उत्सवकाळात महागाई वाढीस कारणीभूत ठरतील, असे निर्णय पेट्रोलियम कंपन्या घेत आहेत. शनिवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरात वाढ केली. सलग तिसऱ्या दिवशी देशात पेट्रोल १६ पैशांनी वाढले आहे. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल दरात १४ ते १६ पैशांची वाढ केली आहे. याआधी गुरुवार आणि शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलचा दर वाढवला होता. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलचा भाव ८८.०२ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लिटर ८०.११ रुपयांवर कायम आहे. जवळपास २२ दिवस डिझेलचा भाव स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ८१.३५ रुपये असून डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.४० रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८२.८७ रुपये आहे. तर डिझेल ७७.०६ रुपये प्रती लीटर आहे.
अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेची घडी आता पूर्वपदावर येत आहे. इंधन मागणी देखील वाढत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला चाट बसली होती. या दरवाढीने दिल्लीत डिझेलचा भाव पेट्रोलच्या पुढे गेला. डिझेल सार्वकालीन उच्चांकावर गेलं होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थानिक कराच्या बोजाने पेट्रोल आणि डिझेलचे भाव भरमसाठ वाढले आहेत. यावर विविध माध्यमातून टीका झाली. त्यानंतर ३० जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलमध्ये ८.३६ रुपये शुल्क कपात केली. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रती लीटर ७३.५६ रुपये प्रती लीटर झाला.