वक्फ सुधारणा विधेयक पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करण्यास सरकार तयार, घटकपक्षांच्या सूचनांचा स्वीकार, अडथळे झाले कमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ एप्रिल ।। वक्फ सुधारणा विधेयक तयार करताना जनता दल(यू), तेलुगू देसम पक्ष (टीडीपी), लोकजनशक्ती पक्ष (रामविलास) व अन्य काही पक्षांनी व्यक्त केलेल्या शंकांचे निरसन केंद्र सरकारने केले आहे. त्यामुळे मंगळवारी लोकसभेत मांडण्यात येणारे हे विधेयक मंजूर होण्यात फारसे अडथळे येणार नाहीत, असे सांगितले जात आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर तो कायदा पूर्वलक्षी प्रभावाने नव्हे तर भावी काळाचे संदर्भ लक्षात घेऊन लागू होईल, असे केंद्र सरकारने ‘एनडीए’च्या घटकपक्षांना सांगितले आहे.

पूर्वलक्षी प्रभावाने वक्फ कायदा लागू न होण्याचा फायदा असा आहे की, वक्फ बोर्डाच्या ताब्यात पूर्वीपासून ज्या मालमत्ता आहेत, त्यांना कोणताही धक्का लावला जाणार नाही. वक्फ सुधारणा कायदा हा त्याच्या अधिसूचनेच्या तारखेपासूनच लागू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. वक्फ बोर्डाच्या सध्या ताब्यात असलेल्या मालमत्ता त्याच्याच ताब्यात राहणे ही एक प्रकारे सरकारने घेतलेली माघार आहे, असे सांगितले जाते.

आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा
Email Address
Register

छोट्या-छोट्या मुद्द्यांवरही बारकाईने विचार
भाजपप्रणित एनडीएतील घटकपक्षांच्या या कायद्याबद्दलच्या बहुतांश मागण्या केंद्र सरकारने स्वीकारल्यामुळे ते पक्ष लोकसभेत विरोध करण्याची शक्यता नाही. मात्र जनता दल (यू) या पक्षाने म्हटले आहे की, वक्फ सुधारणा विधेयक चर्चेसाठी सादर झाल्यानंतर त्यातील छोट्या-छोट्या मुद्द्यांवरही आम्ही बारकाईने विचार करणार आहोत. हे विधेयक लोकसभा, राज्यसभेत मंजूर होईल, असा सरकारला विश्वास आहे.

विरोधी पक्षांचा विधेयकाला कडवा विरोध
वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत विरोधी पक्ष कडाडून विरोध करणार आहेत. हे विधेयक संविधानविरोधी असल्याची टीका त्यांनी केली आहे. मात्र लोकसभेत हे विधेयक मंजूर होईल, असा विश्वास केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला आहे. ते विनाअडथळा मंजूर व्हावे म्हणून भाजपने घटकपक्षांशी बैठका घेऊन चर्चाही केली.

सर्व खासदारांनी लोकसभेत उपस्थित राहावे
नवी दिल्ली : लोकसभेत वक्फ संशोधित विधेयक सादर केले जाणार असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने आपल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. पक्षाच्या खासदारांनी बुधवारी दिवसभर सभागृहात उपस्थित राहावे आणि सरकारच्या भूमिकेचे समर्थन करावे असे व्हीपमध्ये म्हटले आहे. काँग्रेसने देखील व्हीप जारी करत त्यांच्या खासदारांना उपस्थित राहण्यास सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *