महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ एप्रिल ।। गुढीपाडव्याच्या सणानंतर गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात हापूस आंब्याची आवक वाढू लागली आहे. मागील दोन दिवसांत हापूसची आवक तीन हजार पेट्यांनी वाढून चार ते पाच हजार पेट्यांवर पोहचली. त्या तुलनेत मागणी कमी पडल्याने हापूसच्या दरात डझनामागे दोनशे ते सहाशे रुपयांची घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात एक डझन आंब्याची 800 ते 1200 रुपयांना विक्री सुरू आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात कोकणातून दररोज चार ते आठ डझनाच्या चार ते पाच हजार पेट्यांची आवक होत आहे. गुढीपाडव्यापूर्वी ही आवक अवघी एक ते दोन हजार एवढी होती.
सणाच्या दोन दिवसांनंतर आवक दुपटीने वाढल्याने आंब्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात कच्च्या हापूसच्या चार ते आठ डझनाच्या पेटीमागे एक ते दोन हजार रुपयांनी घट झाली आहे. परिणामी, गुढीपाडव्यापर्यंत किरकोळ बाजारात 1000 ते 1800 रुपये डझन मिळणारा आंबा आत्ता 800 ते 1200 रुपयांना उपलब्ध होत आहे.वादळी पाऊस झाल्यास आंब्याला फटका
राज्यभरात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यापासून तूर्तास तरी आंब्याला धोका नाही. मात्र, वादळी पाऊस झाल्यास आंब्याची गळ मोठ्या प्रमाणात होईल. त्यानंतर उत्पादनात घट होऊन आंब्याची आवक कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात बाजारातील आंब्याची आवक ही हवामानावर अवलंबून राहील, अशी शक्यता मार्केट यार्डातील हापूस आंब्याचे व्यापारी युवराज काची यांनी वर्तविली.