![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १९ फेब्रुवारी २०२६ || पिंपरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससेवेत सध्या एक वेगळाच गोंधळ उडाला आहे. नव्या ‘लालपरी’ आणि जुन्या ‘हिरकणी’ (माजी एशियाड) बसमध्ये रंगसंगती वगळता फारसा फरक नसतानाही भाड्यात मात्र मोठी तफावत आहे. सेवा जवळपास समान, आसनरचना सारखी, प्रवासाचा वेगही तोच—मग एका मार्गावर दोन वेगवेगळे दर का? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः पुणे–अकोला आणि स्वारगेट–कोल्हापूर मार्गावर ही तफावत प्रकर्षाने जाणवते.
‘एशियाड’ बसचा इतिहासही तितकाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. १९८२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या Asian Games स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या आरामदायी बसांमधूनच या सेवेचा उगम झाला. स्पर्धेनंतर काही बस खरेदी करून प्रवासी सेवेत दाखल करण्यात आल्या आणि ‘एशियाड’ नावाने त्या लोकप्रिय झाल्या. आरामदायी आसनरचना, तुलनेने जलद प्रवास आणि वेगळी रंगसंगती यामुळे या बसने अल्पावधीतच प्रवाशांची मने जिंकली. ८ मार्च २०१३ रोजी महिला दिनानिमित्त ‘एशियाड’चे ‘हिरकणी’ असे नामकरण करण्यात आले. रंगही गुलाबी-पांढरा करण्यात आला. आता काही बस पुन्हा हिरवा-पांढरा रंगात आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून सध्या २९१ ‘हिरकणी’ बस विविध मार्गांवर धावत आहेत.
मात्र प्रश्न भाड्याचा आहे. साधी ‘लालपरी’ बस पुणे–अकोला मार्गावर ८२० रुपये घेत असताना ‘हिरकणी’साठी ११२५ रुपये मोजावे लागतात. स्वारगेट–कोल्हापूरसाठी ‘लालपरी’चे भाडे ३८८ रुपये, तर ‘हिरकणी’चे ५२५ रुपये आहे. प्रवाशांच्या मते, बसमधील सुविधा फारशा वेगळ्या नसताना केवळ नामकरण किंवा पूर्वीच्या श्रेणीच्या आधारे जादा दर आकारणे योग्य नाही. दरम्यान, राज्य सरकारने तीन हजार डिझेल आणि पाच हजार ई-बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. मात्र ‘हिरकणी’ आणि ‘लालपरी’तील दरतफावतीबाबत अद्याप कोणताही पुनर्विचार झालेला नाही, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे “सेवा समान, मग दर वेगळे का?” हा प्रश्न अधिकच तीव्र होत आहे.
