महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ एप्रिल ।। केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल (बुधवारी) संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले होते. त्यांनंतर काल दुपारी १२ वाजल्यापासून आज मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर सभागृहात चर्चा झाली. यामध्ये सत्ताधारी खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मते व्यक्त केली. तर विरोधकांनी याला जोरदार विरोध केल्याचे पाहायला मिळाले.
वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर
आज मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. यावेळी विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली. दरम्यान वक्फ दुरूस्ती विधेयकावरील मतदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.
अमित शाह काय म्हणाले?
संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण ताकदीने त्याचे समर्थन केले. ते म्हणाले, “माझ्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्याने मांडलेल्या विधेयकाचे मी समर्थन करतो. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू असलेली चर्चा मी लक्षपूर्वक ऐकत आहे. मला वाटते की अनेक सदस्यांचे खरोखरच किंवा राजकीय कारणांमुळे अनेक गैरसमज आहेत.”
वफ्क दुरूस्ती विधेयकावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल लोकसभेत म्हटले की, “महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील महादेव मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला होता. याचबरोबर बीडमधील कंकालेश्वर मंदिराची १२ एकर जमीन वक्फ बोर्डाने जबरदस्तीने ताब्यात घेतली होती.”
भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचे आहे का?
दरम्यान विधेयकावरील चर्चेवेळी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी जुन्या वक्फ विधेयकाच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले, “१९५४ मध्ये संसदेच्या सदस्यांनी विधेयकाला विरोध करूनही, काँग्रेस पक्षाने मुस्लिमांना खुश करण्यासाठी वक्फ कायदा मंजूर केला. वक्फला दुसऱ्या कोणत्याही देशात असे अधिकार देण्यात आलेले नाहीत, तुम्हाला भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचे आहे का?”
विरोधकांनी सरकारला घेरले
दरम्यान या विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारला घेरल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसकडून गोगोई यांचे सभागृहात सत्ताधाऱ्यांकडे पाहत, “जेव्हा तुम्ही तुम्ही भारत छोडो आंदोलनात सहभागी नव्हता तेव्हा त्यांनी भारत छोडोला पाठिंबा दिला होता. जेव्हा तुम्ही इंग्रजांना माफीनामे लिहीत होता, तेव्हा या समुदायातील लोक शहीद होत होते,” असे म्हटले.
याचबरोबर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) अरविंद सावंत आणि एमआयएमचे असुद्दिन ओवैसी यांनी वफ्क दुरूस्ती विधेयकावर जोरदार टीका केली.