महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ एप्रिल ।। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 57 टन गोमांस जप्त केले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर संशयास्पद वाटणारे दोन कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत गोरक्षक संघटनांचाही सहभाग होता. तपासणी अहवालानंतर सदर मास गोमांस असल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका गोरक्षकाने पोलिसांना फोनवरुन दिली माहिती
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून दोन एसी कंटेनर संशयास्पदरित्या येत असून त्यामध्ये गोवंशीय मांस असल्याचा संशय पुण्यातील एका गोरक्षकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांना संपर्क साधत व्यक्त केला होता. त्या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन कंटेनर संशयास्पदरित्या आढळून आले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचे मांस असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. स्थानिक गोरक्षक संघटनांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कंटेनर ताब्यात घेतले.
म्हशीचे मांस असल्याचं सांगितलं पण…
प्राथमिक टप्प्यात वाहतूकदारांनी ते म्हशीचे मांस असल्याचे सांगितले आणि आवश्यक कागदपत्रे दाखवली, मात्र गोरक्षक संघटनांनी यावर आक्षेप घेतला आणि मांसाच्या प्रयोगशाळा तपासणीची मागणी केली. पोलिसांनी दोन्ही कंटेनरमधील मांसाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. प्राप्त झालेल्या अहवालानुसार, हे मांस गोवंशीय असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैदराबाद कनेक्शन समोर
चालक नदीम कलीम अहमद आणि नसीर मोहंमद अहमद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ही वाहतूक मे. एशियन फूड्स मीन अँग्रो हैदराबाद या कंपनीच्या आदेशाने होत असल्याचे समोर आले आहे. कंपनीचे मालक मोहम्मद सादिक कुरेशी यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यभरात गोमांस तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गोमांस बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु असून हे मांस कुठे नेलं जात होतं याचा शोध घेतला जात आहे.