महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ एप्रिल ।। एप्रिल महिन्यात सहसा उन्हाचा तडाखा वाढताना दिसतो मात्र यंदाचा एप्रिल महिना इथं अपवाद ठरत असून, या महिन्यात राज्यावर एकिकडून उष्णतेचा मारा होत असतानाच दुसरीकडे मात्र अवकाळी पावसानं थैमान पाहायला मिळत आहे. गेल्या 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पावसानं हजेरी लावली असून पुढच्या 24 तासांमध्ये हे चित्र आणखी गंभीर होणार असल्याचा स्पष्ट इशारा हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे.
केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं (IMD) राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे. नव्यानं तयार झालेल्या आणि अधिक तीव्रतेनं सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यावर अवकाळीची वक्रदृष्टी पाहायला मिळत आहे. जिथंजिथं पावसानं हजेरी लावलीये राज्चयाच्या त्या भागांमध्ये तापमानाचा आकडा काही अंशांनी कमी झाला असून तो 38 ते 39 अंशांपर्यंत आला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ या भागांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून मध्य प्रदेशच्या दक्षिणेपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं या प्रणालीचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रावर घोंगावणारं अवकाळी आणि गारपिटीचं सावट.
पुढील 24 तास धोक्याचे….
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून दरम्यान गारपिटीचा माराही होणार आहे. या वादळी पावसादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 45 किमी इतका राहणार असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार असल्यानं नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं असा स्पष्ट इशारासुद्धा यंत्रणांनी जारी केला आहे.
हवामानाचा एकंदर इशारा पाहता पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, नाशिक इशं पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत मात्र होरपळ…
राज्यात पावसाचा मारा सुरु असतानाच मुंबईची होरपळ काही कमी होत नाहीय. पुढील चार ते पाच दिवस मुंबईकरांची होरपळ सुरूच राहणार असून, मळभ काही प्रमाणात हटल्यानंतर नागरिकांना आता उन्हाच्या तडाख्यासोबत उकाड्याचाही फटका सोसावा लागत आहे. शहरातील किमान तापमानात नगण्य घट झाली असली तरीही त्यानं दिलासा मात्र मिळालेला नाही. त्यामुळं मुंबईकरांनी या वातावरणात आरोग्य जपावं असं आवाहन करण्यात येत आहे.