महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ एप्रिल ।। सध्या भारतात सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ९३,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. दुबईसह जगात असे अनेक देश आहेत जिथे सोनं अत्यंत स्वस्त आहे. दरम्यान, दुबईला जाणाऱ्यांना तेथून सोनं विकत घेऊन भारतात आणावं असं वाटतं. पण अनेकदा भारतीय विमानतळावर आल्यानंतर स्वस्त सोनं महाग झाल्याचं समोर आलं आहे.
दुबईत सोनं भारतापेक्षा ८ ते ९ टक्क्यांनी स्वस्त आहे. सध्या दुबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ८५ हजार रुपये प्रति १० ग्रॅम आहे. त्यामुळे दुबईत भारताच्या तुलनेत सोनं ८ टक्क्यांपेक्षा जास्त स्वस्त आहे. यामुळेच दुबईला जाणारे लोक तिथून सोनं खरेदी करण्याला प्राधान्य देतात. दुबईहून सोनं आणणं बेकायदेशीर नाही. पण नियमाप्रमाणे सोनं आणलं नाही तर त्यासाठी खिसा रिकामा करावा लागू शकतो. अशा तऱ्हेनं सोनं स्वस्त नाही, तर महाग होतं.
परदेशातून परत आल्यावर परदेशातून आणलेल्या सर्व वस्तूंची माहिती द्यावी लागते. यात सोन्याचाही समावेश आहे. आपण दुबईहून किती सोनं आणू शकता हे तुम्ही स्त्री आहा की पुरुष आणि आपण परदेशात राहण्याच्या वेळेवर अवलंबून असतं. ठराविक मर्यादेपर्यंत कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. त्यापेक्षा जास्त सोनं आणल्यास कस्टम ड्युटी भरावी लागते.
जर तुम्ही सोन्याची घोषणा केली आणि ड्युटी भरली तर चेक इन बॅगेजमध्ये एक किलोपर्यंत सोनं आणू शकता. कस्टमच्या नियमांनुसार एक किलो सोनं आणण्यासाठी किमान ६ महिने परदेशात राहावं लागतं. खरं तर परदेशातून सोनं आणण्यासाठी तुम्ही पात्र आहात हे सिद्ध करावं लागतं. आपण विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांना जे काही सोनं घोषित कराल, ते दुबईमध्ये कायदेशीररित्या खरेदी केलेलं असलं पाहिजे. म्हणजेच सोनं खरेदीच्या पावत्या, प्योरिटीवाल्या खरेदीची इनवॉईस आदी असावीत.
भारतीय पासपोर्ट असलेल्या पुरुषांना २० ग्रॅम सोनं (जास्तीत जास्त किंमत ५०,००० रुपयांपर्यंत) विना ड्युटी आणण्याची परवानगी आहे. महिलांना ४० ग्रॅम पर्यंत सोनं (जास्तीत जास्त किंमत १,००,००० रुपयांपर्यंत) विना ड्युची आणता येते. १५ वर्षांखालील मुलं जास्तीत जास्त ४० ग्रॅम (जास्तीत जास्त किंमत १,००,०० रुपयांपर्यंत) सोन्याचे दागिने विना ड्युटी आणू शकतात.
कस्टम फ्री मर्यादेपेक्षा जास्त सोनं तुम्ही दुबईतून आणू शकता. यासाठी कस्टम ड्युटी भरावी लागणार आहे. सोन्याच्या आयातीवर ड्युटी ६ टक्के आहे, पण सेस आणि जीएसटी जोडल्यानंतर एकूण सीमा शुल्क ९ टक्क्यांच्या आसपास आहे. पुरुषांसाठी २० ग्रॅम ते ५० ग्रॅम, महिलांसाठी आणि मुलांसाठी ४० ग्रॅम ते १०० ग्रॅम सोनं असल्यास ३ टक्के कस्टम ट्युडी आकारली जाते. पुरुषांसाठी ५० ग्रॅम ते १०० ग्रॅम / महिला आणि मुलांसाठी १०० ग्रॅम ते २०० ग्रॅमसाठी कस्टम ड्युटी ६ टक्के आहे. पुरुषांसाठी १०० ग्रॅम पेक्षा जास्त / महिला आणि मुलांसाठी २०० ग्रॅम पेक्षा जास्त सोनं आणल्यास कस्टम ड्युटी १० टक्के आहे.