ब्रेन ट्युमरवर मात करता येणार, नाकाद्वारे औषध थेट मेंदूतील गाठीपर्यंत; नागपुरात उपचाराची नवी पद्धत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ एप्रिल ।। ब्रेन ट्युमर आणि कॅन्सरवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणारे आणि नॅनो पार्टिकल्सचा समावेश असलेले औषध राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फार्मसी विभागाने तयार केले आहे. नाकाद्वारे दिल्यानंतर हे औषध थेट मेंदूपर्यंत पोहोचून उपचार करेल, असा दावा करण्यात आला आहे.

नाकाद्वारे दिलेले औषध थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचत औषधीयुक्त ‘नॅनो पार्टिकल्स’ आता जीवघेण्या ‘ब्रेन ट्युमर’ला भेदणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील संशोधकांनी कॅन्सर या जीवघेण्या आजारावर कोठेही शक्य होईल, अशी उपचाराची नवीन पद्धत शोधून काढली आहे. उपचाराच्या नवीन पद्धतीमुळे कॅन्सरने ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

औषधी निर्माणशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. वीणा शैलेंद्र बेलगमवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सागर त्रिवेदी यांनी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या ‘इन्स्पायर फेलोशिप’मधून हे संशोधन केले आहे. प्रचलित उपचार पद्धतीनुसार कॅन्सर रुग्णांना किमोथेरेपीशिवाय पर्याय नाही. किमोथेरेपीद्वारे रक्ताभिसरणातून रुग्णांना औषध दिले जाते. या प्रचलित थेरेपीमुळे रुग्णांच्या इतर अवयवांवर विपरीत परिणाम होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे संशोधकांनी रक्ताला टाळत न्यूरॉन्सच्या माध्यमातून थेट मेंदूमध्ये औषध पोहोचेल, अशी उपचाराची नवीन पद्धत संशोधनातून शोधून काढली आहे.

‘नोवेल टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम’ असे या नवीन प्रकारच्या उपचारपद्धतीला नाव देण्यात आले आहे. या नवीन प्रकारच्या उपचार पद्धतीसाठी औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ. वीणा बेलगमवार व डॉ. सागर त्रिवेदी यांना दोन पेटंट प्राप्त झाले आहेत. या उपचारपद्धतीबाबत डॉ. सागर त्रिवेदी यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे १२ संशोधन पेपर तर पाच बुक चाप्टर प्रसिद्ध झाले आहेत.
कॅन्सर रुग्णांनी उपचारा दरम्यान घ्यावयाची काळजी

असे करेल काम –
स्प्रेद्वारे नाकावाटे औषधीतील नॅनो पार्टिकल्स न्यूरॉन्सच्या माध्यमातून थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचेल. या नवीन उपचारपद्धतीत औषधी मेंदूतील गाठींपर्यंत पोहोचत असताना रक्ताचा अडथळा होणार नाही, याची दक्षतादेखील घेण्यात आली आहे. शरीराच्या इतर भागांपर्यंत औषध पोहोचणार नसल्याने अन्य अवयवांना इजा होण्याची शक्यता कमी होणार आहे. नवीन पद्धत कोणत्याही टप्प्यातील कॅन्सर रुग्णांना औषधोपचार करण्यासाठी वापरता येणार आहे. रुग्णालयात अथवा कोठेही स्प्रेच्या माध्यमातून वैद्यकीय मार्गदर्शनाखाली औषधोपचार घेणे सुलभ होणार आहे. त्यामुळे रुग्णांचा वेळ तसेच पैशाची बचतदेखील होईल, असा दावा संशोधकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *