Gold Price: लाखाच्या दिशेने वाटचाल करणारे सोने घसरणपंथीला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ एप्रिल ।। जगभरातील वाढत्या टॅरिफ वॉरचा परिणाम सोने आणि चांदीवर होऊ लागला आहे. सोमवारी दागिन्यांच्या किमती घसरल्या त्यामुळे, आता सोने आणि चांदी खरेदी करण्याचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे असे आपण मानावे का? खरं तर, सोन्याच्या दरवाढीला चीनची नजर लागली आहे. चीनने अमेरिकेवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादल्यापासून सोन्याच्या किमती सतत घसरत आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमती सलग दुसऱ्या दिवशी घसरल्या आहेत.

.
सोन्याच्या सुस्साट दरवाढीला ब्रेक
सोन्यातील गुंतवणूक नेहमीच सुरक्षित मानली गेली आहे. शेअर बाजारात विक्री होताना सोन्याच्या किमतीला अनेकदा गगनाला भिडल्या आहेत पण, यावेळी काही भलतंच घडत आहे. जागतिक तसेच भारतीय सराफा बाजारात सध्या सगळं उलटच होत आहे. ७ एप्रिल रोजी शेअर बाजारात एका वेळी सेन्सेक्समध्ये ३,९०० अंकआणि निफ्टीमध्ये १,४०० अंकांची घसरण झाली. शेअर बाजारासाठी हा ब्लॅक मंडे होता. अशा परिस्थितीत सोन्याच्या किमती वाढायला हव्या होत्या पण, सोन्याच्या किमती सलग दुसऱ्या दिवशी कमी झाल्या आहेत.

गगनाला भिडलेले सोन्याचे दर कमी झाले
दोन दिवसांत सोन्याच्या किमतीत २९०० रुपयांची घसरण झाली तर, चांदीच्या किमतीत सलग पाचव्या दिवशी घसरण नोंदवली गेली असून आतापर्यंत चांदी १०,५०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे आणि सोन्याच्या किमतींचे अतिमूल्यन झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत विक्री दिसून येत असल्याचे तज्ज्ञांच्या मत आहे. त्याचवेळी, येत्या काळात सोन्याचे भाव आणखी घसरू शकतात, असाही विश्लेषकांच्या अंदाज आहे.

आदल्या दिवशी, सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किमती सुमारे ७०० रुपयांची स्वस्त झाल्या. गेल्या आठवड्यातही सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाली होती, ज्यामुळे गुंतवणूकदार आश्चर्यचकित झाले आहेत. जागतिक मंदीची वाढती भीतीच्या पार्श्वभूमीवर सोनीची चमक कमी होणे खरंच आश्चर्याची बाब आहे. गेल्या दोन व्यापार सत्रांमध्ये सोन्याच्या किमती ४% पेक्षा जास्त घसरल्या असून फक्त ४ एप्रिल, शुक्रवारी ३% मोठी घसरण नोंदवली गेली होती.

त्यामुळे यावर्षी लवकरच सोन्याची किंमत लाखांच्या घरात जाईल असं दिसत होतं मात्र, गेल्या काही दिवसांच्या घसरणीनंतर खरेदीदारांना नक्कीच किंचित दिलासा मिळाला असेल. एकीकडे जागतिक बाजारात सोन्याच्या किमती कमी झाल्या, ज्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून आला. २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९०,६५० रुपयांवर घसरला तर, याच महिन्यात सोन्याच्या दरांनी प्रति १० ग्रॅम सोन्याने ९५,००० रुपयांची पातळी ओलांडली होती. अशा स्थितीत, शेअर बाजाराच्या मंदीत सोने खरेदी करणाऱ्यांची चांदी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *