महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० एप्रिल ।। एप्रिल महिन्यातच अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाच्या झळांनी अवघ्या खान्देशकरांची होरपळ सुरू झाली आहे. ‘हॉट सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही कमाल तापमान आता ४३ अंशांवर पोहचले आहे. नाशिकचे तापमानही ४१ अंशावर गेले, तर मालेगावचे तापमान ४३.२ अंशांवर गेल्याने या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. एप्रिलमध्येच पारा ४३ अंशांवर गेल्याने आतापासूनच खान्देशवासियांनी ‘मे हीट’ चा धसका घेतला आहे.
यंदा मार्च व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे उन्हाच्या तीव्र झळांपासून नागरिकांना दिलासा मिळाला होता. वातावरणात बदल होताच. गेल्या आठ दिवसांत तापमान थेट ६ ते ७ अंशांनी वाढले आहे. दोन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे खान्देशातील अबालवृद्ध कासावीस झाले आहेत. दुपारी खान्देशातील मुख्य शहरांतील रस्ते उन्हाच्या झळांमुळे ओस पडू लागले आहेत. दरम्यान, रात्री ११ वाजेपर्यंत उष्मा जाणवत असल्याने नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
खान्देशातील तापमान
जळगाव- ४३. ५
धुळे- ४३
नंदुरबार- ४३.५
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे काही खासगी हवामान अभ्यासकांनी ४५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.