महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ एप्रिल ।। एसटी कर्मचार्यांना मार्च महिन्याचा केवळ 56 टक्के पगार मिळणार आहे. पहिल्यांदाच इतका कमी पगार कर्मचार्यांना देण्यात येणार असल्याने एसटी कर्मचारी संघटनेकडून संताप व्यक्त करण्यात आला असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निधी नसल्यामुळे एसटी कर्मचार्यांना पगार कमी देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. आधीच अपुरा पगार आणि त्यात जर फक्त 56 टक्के पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचार्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न एसटी कर्मचार्यांनी सरकारकडे उपस्थित केला आहे. सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलनाची भूमिका घेऊ, असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.
एसटी कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांमध्ये 2018 पासूनच्या थकित महागाई भत्त्याचा समावेश आहे. हायकोर्टाने भत्ता एकरकमी द्या, असे आदेश दिले आहेत, तरी कर्मचार्यांचा 56 टक्के महागाई भत्ता थकित आहे. कर्मचार्यांचे पगार 7 तारखेला होत नाहीत. कर्मचार्यांच्या महिन्याच्या पगारासाठी केवळ 440 कोटी रुपये लागतात. मात्र उत्पन्न 700 कोटी असूनही पूर्ण पगार आणि जो पगार दिला जातो तोही वेळेवर नाही, अशी कर्मचार्यांची तक्रार आहे.