टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन होणार स्वस्त ; अमेरिकेसोबतच्या ‘व्यापार युद्धा’मुळे चिनी उत्पादकांकडून भारतास ५ टक्के सूट देण्याचा प्रस्ताव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ एप्रिल ।। ‘व्यापार युद्धा’मुळे इलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग उत्पादन करणाऱ्या चिनी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना ५ टक्क्यांपर्यंत सवलतीच्या दरात माल पुरवठा करण्याचे प्रस्ताव दिले आहेत. त्यामुळे भारतात टीव्ही, फ्रिज आणि स्मार्टफोन यांसारख्या वस्तू स्वस्त होऊ शकतात. मागणी वाढविण्यासाठी भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक सवलती ग्राहकांना देतील. त्यातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे स्वस्त होऊ शकतात.

अमेरिकेने १२५ टक्के टॅरिफ लावल्यामुळे चिनी कंपन्यांच्या वस्तू महाग होतील. टॅरिफमुळे चीनने अमेरिकेत निर्यात केलेल्या १०० डॉलरच्या वस्तूंची किंमत २२५ डॉलर होईल. त्यामुळे मागणी घटणार आहे. मागणी वाढविण्यासाठी चिनी कंपन्या भारतास किमतीत ५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा उदारपणा दाखवित आहेत. याचा थेट फायदा भारतीयांना होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाटाघाटींचा मार्ग झाला मोकळा
अमेरिकेने आयात करास ९० दिवसांची स्थगिती दिल्यामुळे वाटाघाटींचा मार्ग मोकळा झाला आहे, असे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे (फियो) अध्यक्ष एस. सी. रल्हन यांनी सांगितले. तोडग्यासाठी मार्ग निर्माण व्हावा म्हणून आयात करांस स्थगिती दिली गेली आहे, असे दिसते, असे ते म्हणाले.

अमेरिका-चीन व्यापार तणावामुळे जगाला फटका
अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे जागाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असा इशारा जागतिक व्यापार संघटनेने दिला आहे. या जागतिक व्यापार अनिश्चिततेचे नकारात्मक परिणाम केवळ अमेरिका आणि चीनपुरते मर्यादित राहणार नाहीत तर इतर अर्थव्यवस्थांवर, विशेषतः कमी विकसित देशांवरही त्याचा परिणाम होईल, असे संघटनेने म्हटले आहे.

चीनमधून कशाची होते सर्वाधिक आयात?
चीनमधून भारतात सर्वाधिक आयात इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची होते. यात स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, पाॅवर सप्लायज् आणि इलेक्ट्रॉनिक सुटेभाग यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक उपकरण आयात ३०.६३ अब्ज डॉलर इतकी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *