महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ एप्रिल ।। कर्णधार ऋतुराज गायकवाड जायबंदी झाल्याने उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व पुन्हा एकदा एमएस धोनीकडे सोपवण्यात आलं आहे. चेन्नईच्या संघाने गुरुवारी यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे. अशातच पुन्हा एकदा कर्णधारपद मिळाल्यानंतर धोनीची पहिली प्रतिक्रियाही समोर आली आहे.
आज चेन्नईचा कोलकाताशी सामना होणार आहे. त्यापूर्वी चेन्नईचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धोनीच्या कर्णधारपदाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, महेंद्रसिंग धोनीने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधारपद स्वीकारण्यास कोणताही संकोच दाखवला नाही.
फ्लेमिंग म्हणाले, “धोनीने पुढे येऊन संघाला या परिस्थितीतून बाहेर काढण्यास तयारी दर्शवली आहे. आम्ही आता पर्यायी खेळाडू शोधतो आहे. आमच्याकडे चांगले अनुभवी खेळाडू आहेत. ते बऱ्याच वर्षांपासून ते संघाबरोबर आहेत. यापुढे संघाला मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे” धोनीच्या या निर्णयामुळे पुढील हंगामात संघाला नवी दिशा मिळण्याची आशा आहे.
महेंद्रसिंग धोनीने यापूर्वी २००८ ते २०२३ दरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघाचं नेतृत्व केले आहे. यादरम्यान चेन्नईने पाच आयपीएल विजेतेपदे मिळवली आहेत. २०२४ च्या हंगामापूर्वी धोनी ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, आता ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्याने त्याला संघाबाहेर जावं लागणार आहे.
गायकवाडच्या अनुपस्थितीत सीएसके समोर फलंदाजीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. संघाला आता राहुल त्रिपाठी, दीपक हुडा किंवा वंश बेदी यांच्यासारख्या खेळाडूंवर अवलंबून राहावे लागणार आहे. याशिवाय, मुंबईचा युवा खेळाडू आयुष म्हात्रे याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.