महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ एप्रिल ।। राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज म्हणजे सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी साजऱ्या होत असलेल्या १३४ व्या जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊ की स्मारकाचे काम कुठवर आले आहे ?
मुंबईत दादरच्या इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक साकारण्याचे काम सुरू आहे. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी अलिकडेच या कामाचा आढावा घेतला.
स्मारकाच्या प्रवेश प्रांगणाचे काम ८८.५ टक्के पूर्ण झाले आहे. स्मारकातील व्याख्यानगृहाचे काम ७८.७५ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच स्मारकातील ग्रंथालयाचे काम ८१ टक्के पूर्ण झाले आहे. तर स्मारकातील तर प्रदर्शन आणि प्रेक्षागृहाचे काम ६८ टक्के पूर्ण झाले आहे. स्मारक परिसरातील पदपथ इमारतीचे काम ५२.८ टक्के पूर्ण झाले आहे. स्मारकाच्या आवारातील डबल बेसमेंट पार्किंग अर्थात वाहनतळाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २३० फूट उंचीच्या थर्माकोल मॉडेलचे काम पूर्ण झाले आहे. पुतळ्यासाठी १३९५ मेट्रिक टन संरचनात्मक स्टीलची खरेदी झाली आहे. पुतळ्याच्या १५५ मेट्रिक टन बेसप्लेटचे फॅब्रिकेशन आणि उभारणी पूर्ण झाली आहे. एकूण दहा हजार ५१० चौरसमीटर पैकी ३०८ चौरसमीटर कांस्य पॅनेलिंगचे काम पूर्ण झाले आहे.