Gold Price Hike | सोन्याच्या किमतीत वाढच वाढ ; या वर्षी देशात 10 ग्रॅम सोनं 1.3 लाख रुपयांपर्यंत पोहोचणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ एप्रिल ।। जागतिक व्यापार युद्धाच्या (ट्रेड वॉर) पार्श्वभूमीवर सध्याच्या 3247 डॉलर्स प्रति औंस (सुमारे 28.3495 ग्रॅम) वरून आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमती 4500 डॉलरवर पोहोचू शकतात, असा अंदाज विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमन सॅक्सने वर्तवला आहे. यामुळे भारतात या वर्षाच्या अखेरपर्यंत सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे एक लाख 30 हजार रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.

विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमन सॅक्सने वाढत्या अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा आणि मंदीच्या शक्यतेचा हवाला देत म्हटले आहे की, अत्यंत धोकादायक परिस्थितीत 2025 च्या अखेरीस सोन्याची किंमत 4,500 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. पण परिस्थिती बिघडली नाही आणि ती सामान्यच राहिली तर मात्र सोन्याची किंमत 2025 च्या अखेरीस वाढून 3,700 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

गोल्डमन सॅक्सने सोन्याच्या लक्ष्य किमतीमध्ये तिसर्‍यांदा वाढ केली आहे. यापूर्वी सॅक्सने सोन्याच्या किमतीचे लक्ष्य वाढवून 3,300 डॉलर प्रति औंस केले होते. अमेरिका-चीन व्यापार युद्धात वाढ झाल्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल वाढलेल्या चिंतेमुळे मंदीपासून बचाव करण्यासाठी सोन्याची मागणी वाढली आहे. सोन्याच्या किमतीत गेल्या आठवड्यात 6.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोव्हिड-19 नंतर सोन्याची ही सर्वोत्तम साप्ताहिक कामगिरी आहे. याचे कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफमुळे जागतिक स्तरावर वाढलेली अस्थिरता आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळत आहे, असे गोल्डमन सॅशने अहवालात म्हटले आहे.

मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची मागणी वाढली
बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की, मंदीचा धोका, बाँड यील्डमधील वाढ आणि वित्तीय अस्थिरतेची चिंता गुंतवणूकदारांना सोन्याकडे आकर्षित करत आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांव्यतिरिक्त संस्था आणि मध्यवर्ती बँकांकडूनही सोन्याची मागणी सध्या वाढत आहे. त्यामुळे किमतही वाढत आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत गोल्ड आधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मध्ये 2020 नंतर सर्वात जास्त गुंतवणूक झाली आणि त्यात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. मध्यवर्ती बँका, उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये, डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात सोने खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *