US China Trade War: चीनकडून बोइंगबंदी? अमेरिकी विमान कंपन्यांकडून विमाने, सुटे भाग विकत न घेण्याचे निर्देश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ एप्रिल ।। अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्धाची झळ आता नागरी विमानक्षेत्रासही बसू लागली आहे. अमेरिकेने लागू केलेल्या १४५ टक्के आयातशुल्कास ठोस प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेकडून बोइंग विमाने खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लूमबर्गने हे वृत्त दिले आहे.

चीन हा बोइंगचा मोठा आयातदार देश असल्याने या निर्णयाचा बोइंगला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बोइंग व अन्य अमेरिकी विमान कंपन्यांकडून विमानांसाठीचे सुटे भाग किंवा संबंधित उपकरणेही विकत घेऊ नयेत, असे निर्देश चीनने आपल्या विमान कंपन्यांना दिले आहेत.

ट्रम्प यांच्याकडून वाहनउद्योगास दिलासा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाहन उद्योगास आयातशुल्कातून काही काळापुरती सवलत देण्याचे संकेत दिले आहेत. ‘कार उत्पादक कंपन्यांच्या पुरवठा साखळीची प्रक्रिया बिघडू नये, यासाठी हा प्रस्ताव विचाराधीन आहे,’ असे ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले. ओव्हल ऑफिस येथे पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. ‘नवीन आयातशुल्कामुळे काही कार कंपन्यांना अडचण होऊ नये, यासाठी त्यांना मदत करण्याचा निर्णय मी घेतला आहे. कॅनडा, मेक्सिको आणि अन्य ठिकाणी होणारे कार उत्पादन अन्यत्र सुरू करण्यासाठी काही कंपन्यांना मुदत हवी आहे. यातील काही कंपन्या त्यांचे उत्पादन अमेरिकेतही सुरू करणार आहेत. त्यामुळे त्यांना वेळ देण्यासाठी कारवरील वाढीव आयातशुल्कात काही काळापुरती सवलत देण्यात येईल,’ असे ते म्हणाले.

दरम्यान, ‘अमेरिकेसोबत नव्याने व्यापार करार करण्यासाठी युरोपीय महासंघ उत्सुक आहे, असे महासंघाचे व्यापार व आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोव्हिक यांनी सोमवारी सांगितले. ‘आम्ही अमेरिकेसोबत वाजवी व्यापार करार करू इच्छितो. खास करून, औद्योगिक उत्पादनांच्या बाबतीत अमेरिकेशी द्विपक्षीय शून्य शुल्क धोरण असावे, अशी आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले.

जिनपिंग यांचा आग्नेय आशियाकडे मोर्चा
बँकॉक: अमेरिकेने जबर आयातशुल्क लागू केल्यानंतर चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी आग्नेय आशियाकडे मोर्चा वळवला आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे ते मंगळवारी दाखल झाले. त्यांचा हा दौरा कंबोडियात संपणार आहे. ‘स्थैर्य आणि शाश्वती ही वैशिष्ट्ये असणाऱ्या चीनसोबत व्यापारी उलाढाल वाढवा,’ असे आवाहन ते या देशांना करत आहेत. जिनपिंग यांचा हा दौरा सोमवारपासून व्हिएतनाम येथून सुरू झाला. त्यांनी व्हिएतनामसोबत अनेक करार केले.

कम्प्युटर चिप्सची होणार चौकशी
बँकॉक : कम्प्युटर चिप्स, चिप्सच्या उत्पादनासाठीची उपकरणे व औषधे आदी वस्तूंच्या आयातीची चौकशी करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. अमेरिकी सरकारच्या वाणिज्य विभागाने संघीय निबंधकांकडे याबाबत सोमवारी उशिरा नोटीस दाखल केल्या असून यावर तीन आठवड्यांत सर्वसामान्य नागरिकांचे अभिप्राय मागवले आहेत. आयातीनंतर कार, फ्रिज, स्मार्टफोन आदी उपकरणांमध्ये वापरण्यात येणाऱ्या कम्प्युटर चिप्सचा राष्ट्रीय सुरक्षेवर काय परिणाम होतो, याचा तपास करण्यात येत आहे, असे वाणिज्य विभागाने म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *