![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ एप्रिल ।। हवामान विभागानं राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दक्षिणेपासून ते अगदी मध्य भारतापर्यंत सक्रिय असणाऱ्या वाऱ्यांची एकंदर दिशा पाहता राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असून, त्यामुळं सातारा,कोल्हापूर आणि पुण्यात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर सांगली, सोलापूर, नांदेडसह इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्याच्या कोणत्या भागांमध्ये अवकाळीचा तडाखा?
येत्या 1 ते 2 दिवसात नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांनासुद्धा अवकाळीचा तडाखा बसणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
एकिकडे अवकाळीचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे मात्र विदर्भातील कमाल तापमान मंगळवारी 40 अंशांपुढे नोंदवल्याची बाब समोर आली. अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळमध्ये पारा चाळीशीपार गेला. तर गोंदियात 39.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. जिथं पारा 43.7 अंश सेल्सिअसवर पोहोचला. त्यामागोमाग लोहगाव, जळगाव, पुणे, मालेगाव, आणि सोलापूर इथं तापमान चाळीशीपार गेल्याचं पाहायला मिळालं.
मुंबईतही उष्मा कायम…
मुंबईत सलग दुस-या दिवशी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, पुढील 24 तासांमध्ये ही स्थिती जै से थे राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. शहरातील या तापमानवाढीसोबत हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे उष्मा अधिक तीव्रतेनं जाणवू लागला आहे.
देशभरातील हवामानाचा काय अंदाज?
खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदरच्या (Skymet Weather) माहितीनुसार उत्तर भारतातील पर्वतीय भागांमध्ये 16 एप्रिलपासून नव्यानं एक पश्चिमी झंझावात सक्रिय आहे. याशिवाय मैदानी भागांमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असून या दोन्ही प्रणाली सक्रिय असल्यामुळं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये धुळ, मातीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
