महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २३ ऑगस्ट -महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. परंतु, आता जर तुम्हाला कोरोनाची लक्षणे असतील तरच चाचण्यात करण्यात याव्यात अशी महत्त्वाची नवी सूचना राज्य सरकारने दिल्या आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून लॉकडाउन असल्यामुळे आता अनलॉकची घोषणा करत एक व्यवसाय हळूहळू सुरू केले जात आहे. राज्याअंतर्गत एसटी बस सेवाही सुरू झाली आहे. त्याचबरोबर बाजारपेठाही खुल्या करण्यात आल्या आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सरसकट कोरोनाची चाचणी केली जात होती. पण, आता जर एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तरच त्याची चाचणी करण्यात यावी अशी सूचना राज्य सरकारने काढली आहे. व्यापारी, प्रवासी व्यक्तींमध्ये जर कोरोनाची लक्षणे आढळत नसतील तर त्यांची कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असे राज्य सरकारने नव्याने दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे.
याआधी कोरोनाची चाचणी ही स्वॅब घेऊन केली जात होती. त्यामुळे या चाचणीचा अहवाल हा 24 तासानंतर मिळतो. या चाचणीसाठी सुमारे अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागत आहे. तर दुसरीकडे आता अँटिजन चाचणी केली जात आहे. यात पाचशे रुपयांमध्ये अवघ्या 20 मिनिटांमध्ये रिपोर्ट प्राप्त होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची लगेच ओळख पटत आहे. त्यामुळे संशयितांना क्वारंटाइन करण्यात येत आहे तर कोरोनाबाधितांना तातडीने कोविड सेंटरमध्ये हलवण्यात येत आहे. पण, तरीही राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
केंद्र सरकारनेही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या कराव्यात असे आदेश दिले होते. त्यानंतर आता राज्य सरकारनेही नवीन मार्गदर्शन सूचना जारी केली आहे.त्यामुळे ज्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहे अशा लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्यांची कोरोनाची चाचणी आवश्यक आहे, अशा व्यक्तींचीच अँटिजन चाचणी केली जाणार आहे. एखादी व्यक्ती जर कोरोनाबाधित रुग्णांच्या हायरिस्क संपर्कात आली किंवा विदेशातून आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा गर्भवती महिलेला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले असेल तर दोघांचीही कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. ज्या ठिकाणी सोईसुविधा नाही अशा ठिकाणी अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे.