महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ एप्रिल ।। रिझर्व्ह बँकेनं (RBI) रेपो दरात कपात केल्यानंतर अनेक बँकांनीही एफडीच्या व्याजदरात कपात केली आहे. मात्र, पोस्ट ऑफिसनं अद्याप आपल्या बचत योजनांच्या व्याजदरात कपात केलेली नाही.
अशा तऱ्हेने पोस्ट ऑफिसचे व्याजदर बँकांपेक्षाही अधिक आकर्षक झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्ही ५ लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला थेट २,२४,९७४ रुपये निश्चित व्याज मिळेल.
बँकांमध्ये उघडलेल्या एफडी खात्यांप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्ये टीडी खाती (टाइम डिपॉझिट) उघडली जातात. पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांच्या कालावधीत टीडी खाती उघडली जातात. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना १ वर्षाच्या टीडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या टीडीवर ७ टक्के, ३ वर्षांच्या टीडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या टीडीवर ७.५ टक्के व्याज देत आहे.
जर तुम्ही ५ वर्षांच्या टीडीमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये ५ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण ७,२४,९७४ रुपये मिळतील. या रकमेत तुमच्या गुंतवणुकीचे ५,००,००० रुपये आणि व्याजाचे २,२४,९७४ रुपये यांचा समावेश आहे.
पोस्ट ऑफिसटीडी स्कीममध्ये ग्राहकांना गॅरंटीसह पूर्णपणे निश्चित व्याज मिळतं. पोस्ट ऑफिसच्या टीडी खात्यावर सर्व ग्राहकांना समान व्याज मिळतं, मग ते सर्वसामान्य नागरिक असोत किंवा ज्येष्ठ नागरिक. टीडी खात्यात कमीत कमी १००० रुपये जमा करता येतात, तर जास्तीत जास्त ठेवींची मर्यादा नाही.
पोस्ट ऑफिसमध्ये जमा झालेले तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. खरे तर पोस्ट ऑफिस ही सरकारी यंत्रणा असून, ती केंद्रामार्फत चालविली जाते. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसमध्ये जमा झालेल्या प्रत्येक पैशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे.