महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ एप्रिल ।। अनेक राज्यात भाषेवरून वाद सुरू असतानाच महाराष्ट्रात आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी, इंग्रजीबरोबरच हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषासंवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता 1 ते 5 मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील.
महाराष्ट्रातील काही शाळांमध्ये आत्तापर्यंत दोन भाषा शिकवल्या जायच्या मात्र नितीअतंर्गंत विद्यार्थ्यांना आता तीन भाषा सक्तीने शिकवण्यात येणार आहेत. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्रातील काही शाळांमध्ये तिन्ही भाषा सक्तीने शिकवण्यात येतात. इंग्रजी आणि मराठीसोबतच आता हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार, आता महाराष्ट्रात 5+3+3+4 अंतर्गंत अभ्यासक्रम असणार आहे. अभ्यासक्रम चार टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. पहिले पाच वर्ष (3 वर्ष प्री प्रायमरी आणि क्लास 1,2) पायाभूत स्तर असणार आहे. त्यानंतर इयत्ता 3 ते 5 पर्यंत पूर्वतयारी स्तर असणार आहे. पूर्व माध्यमिक स्तर : वय 11 ते 14 – इयत्ता सहावी, सातवी व आठवी, माध्यमिक स्तर : वय 14 ते 18 -इयत्ता नववी ते बारावी असा शैक्षणिक आकृतिबंध असणार आहे.
पुस्तकातही बदल
नवीन अभ्यासक्रमानुसार, आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके NCERTच्या अभ्यासक्रमावर अधारित असणार आहे. सामाजिक विज्ञान आणि भाषासारख्या विषयात राज्यातील स्थानिक संदर्भाचा समावेश केला जाईल आणि त्यात आवश्यक संशोधनदेखील करण्यात येईल. इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तके बालभारतीकडून तयार केली जाणार आहेत.
या धोरणानुसार पायाभूत साक्षरता, 3 अनुभवाधिष्ठित शिक्षण, मूल्याधारित अभ्यासक्रम, समग्र मूल्यांकन आणि शिक्षक प्रशिक्षण यावर विशेष भर दिला जाणार आहे. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने या अभ्यासक्रम आराखड्यांना मान्यता दिली आहे.
अशी होणार अंमलबजावणी
2025-26 इयत्ता 1
2026-27 इयत्ता 2,3,4 आणि 6
2027-28 इयत्ता 5,7,9 आणि 11
2028-29 इयत्ता 8,10 आणि 12