Gold Price Today: सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक दरवाढ ; भाव पोहोचले लाखाच्या घरात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ एप्रिल ।। सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे, सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता सोन्याच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांकी झेप घेतली आहे. कमकुवत डॉलर आणि अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या अनिश्चिततेमुळे नवीन मागणी वाढल्याने सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमतींनी एक लाखांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे.

अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉरचा परिणाम संपूर्ण शेअर बाजारावर झाला. मंदीच्या भीतीमुळे लोक शेअर बाजारातून पैसे काढून सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये आपले पैसे गुंतवत आहेत परिणामी दोन्ही मौल्यवान धातूचे भाव आता गगनाला भिडले आहेत.

सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक दरवाढ
सोन्याच्या रोज बदलत्या किमती सामान्य लोकांपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांसाठी विशेष महत्त्वाच्या असतात विशेषतः लग्नसराई किंवा सणोत्सव जवळ येतात सोन्याच्या किमतीकडे सर्वांच्याच नजरा खिळलेल्या असतात. अशा स्थितीत आज, 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमतीत पाहून सामान्यांना धडकी भरेल एवढी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर MCX वरील सोन्याचा जून वायदा दरांनी मंगळवारी प्रति 10 ग्रॅम 99,178 रुपयांचा नवीन उच्चांक गाठला, जो मागील बंदपेक्षा जवळपास 1,900 रुपयांनी वाढला.

सोमवारी जीएसटी वगळता सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 97,200 रुपये होता तर 3 टक्के जीएसटी जोडून किरकोळ बाजारात सोन्याच्या किमती 1 लाख रुपयांच्या पातळीपेक्षा जास्त वाढल्या. दरम्यान, चांदीचा मे वायदा भाव 0.33% किंवा 315 रुपयांनी वाढून 95,562 रुपये/किलोवर ओपन झाला. मागील व्यापार सत्रात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी सकारात्मक पातळीवर स्थिरावले होते.

चालू व्यापार तणाव, व्याजदर कपातीची अपेक्षा, भू-राजकीय अनिश्चितता आणि कमकुवत डॉलर यामुळे यावर्षी सोन्या आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार झाले आहेत. सोन्याच्या किमतीत आतापर्यंत 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली, ज्यामध्ये 2 एप्रिल रोजी अमेरिकन प्रशासनाने कर जाहीर केल्यापासून 6% वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत खूप जास्त अस्थिरता दिसून आली असून अमेरिकेचे अध्यक्ष आणि फेड अध्यक्ष यांच्या व्याजदर कपातीवरून झालेल्या वादानंतर डॉलर निर्देशांक तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *