महाराष्ट्र 24 : ऑनलाईन : दिनांक 6 मे : मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी ऊन अशी परिस्थिती निर्माण झालीये. मे महिना म्हटले की, कडाक्याचे ऊन राज्यात सर्वत्र असते. मात्र, यंदा परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे बघायला मिळतंय. राज्यात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस पडतोय. जालना, वाशिममध्ये मुसळधार पाऊस झालाय. यासोबतच अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या राज्यात पावसाला पोषक असे वातावरण बघायला मिळतंय.
जालना, बीड, लातूर, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिट
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झालीये. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. हेच नाही तर भारतीय हवामान खात्याकडून मोठा इशारा देखील देण्यात आलाय. राज्यावर अवकाळीचे संकट कायमच असल्याचे यावरून दिसत आहे. अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका बसलेला असताच आता हवामान विभागाकडून आता परत अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा दिलाय.
भारतीय हवामान विभागाकडून पुढील सहा दिवस तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. विजांसह गारपिट आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हा अलर्ट तब्बल १७ जिल्हांसाठी देण्यात आला आहे. आज दुपारनंतर अनेक ठिकाणी गारपिटीसह पावसाने झोडपले आहे. विदर्भात एकीकडे पारा वाढताना दिसत आहे तर काही ठिकाणी पाऊसही झाला.
पावसासह वाहणार ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे
मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही पुढील काही दिवस पावसाचा इशारा आहे. यादरम्यान वारे देखील ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणार आहे. एकीकडे पाऊस सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मुळात म्हणजे होळीनंतर पारा वाढण्याचे संकेत असताना पाऊस होताना दिसतोय. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाही अनेक भागांमध्ये पाऊस झाला. आता तिच परिस्थिती मे महिन्याच्या सुरूवातीला देखील बघायला मिळत असून पाऊस हजेरी लावतोय.